Tuesday , September 17 2024
Breaking News

कोल्हापूर जिल्ह्यातील 1025 पैकी 569 गावांत विधवा प्रथेला मुठमाती देण्यासाठी ठराव!

Spread the love

कोल्हापूर : जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील हेरवाड गावाने विधवा प्रथेला मुठमाती देण्याचा ऐतिहासिक निर्णय मे महिन्यात घेतल्यानंतर तोच पॅटर्न राबवण्यासाठी जिल्ह्यातील निम्म्या गावांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे विधवा जगणं येणार्‍या अनेक महिलांच्या चेहर्‍यावर समाधानाची आणि सन्मानाची कळी खुलणार आहे. या निर्णयाने विधवा महिलांचे सौभाग्यलंकार कायम राहतील. शिवराज्यभिषेक दिनी जिल्ह्यातील गावांमध्ये विशेष ग्रामसभा बोलावण्यात आली होती. या ग्रामसभेत विधवा प्रथा बंद करण्यासाठी ठराव पास करण्यात आले.
राज्यातच नव्हे, तर संपूर्ण देशात कोल्हापूर जिल्हा पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखला जातो. कोल्हापूर संस्थानचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतीशताब्दी वर्षामध्ये जिल्ह्यात क्रांतीकारी पाऊल प्रत्येक गावातून उचलण्यात येत असल्याने एक प्रकारे आपल्या लोकराजाला कृतीतून वंदन केलं आहे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
हेरवाड ग्रामपंचायतीने पहिल्यांदा विधवा प्रथेला मुठमाती देण्यासाठी ठराव केल्यानंतर त्याचे सर्वच स्तरातून स्वागत झाले. राज्य सरकारकडून याची दखल घेण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही हा पॅटर्न राज्यभर राबवण्यासाठी सूचना केल्या. हेरवाडने दिशा दाखवल्यानंतर जिल्ह्यातील 1025 गावांपैकी 569 गावांमध्ये विधवा प्रथा बंदीविरोधात ठराव झाले आहेत.
कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार उर्वरित गावांमध्ये सभा तहकूब झाल्याने ठराव पास झाले नाहीत. मात्र, 15 जूनपर्यंत उर्वरित 456 गावांमध्ये विधवा प्रथेविरोधात ठराव होतील.
विधवा प्रथेविरोधात ठराव करण्यात भुदरगड तालुका आघाडीवर
विधवा प्रथेविरोधात सर्वाधिक ठराव भुदरगड तालुक्यातून झाले आहेत. तालुक्यातील 89 गावांनी विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव केला आहे. त्यानंतर करवीर तालुक्याचा नंबर असून 70 गावांमध्ये ठराव पास झाले आहेत.
हेरवाडने आदर्श घालून दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना पत्र पाठवून राज्यातील अनेक ग्रामपंचायतींना ठराव पास करण्यासाठी विनंती केली होती. त्यानंतर मुश्रीफ यांनी सर्व ग्रामपंचायतींना सूचना केल्या होत्या.
कोणत्या तालुक्यात किती ठराव झाले?
करवीर 70
हातकणंगले 44
शिरोळ 33
कागल 45
गडहिंग्लज 42
आजरा 44
भुदरगड 89
राधानगरी 32
गगनबावडा 5
पन्हाळा 39
शाहूवाडी 68

About Belgaum Varta

Check Also

शिनोळी येथे ‘स्पर्धा परीक्षांचा दृष्टीकोन शालेय जीवनात कसा वाढवावा’ या विषयावर प्रा. जॉर्ज क्रूझ यांचे सखोल मार्गदर्शन

Spread the love  शिनोळी (रवी पाटील) : शिनोळी येथील समाज मंदिर येथे ‘शालेय जीवनापासून स्पर्धा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *