कोल्हापूर : शहरासह ग्रामीण भागात गांजा तस्करी करणाऱ्या दोन तस्करांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने गुरुवारी बेड्या ठोकल्या. रमेश दादासाहेब शिंदे ( वय ४४, रा. विक्रमनगर, कोल्हापूर) आणि समाधान मारुती यादव (वय २९, रा. घाटंग्री जि. उस्मानाबाद) अशी त्यांची नावे आहेत. संशयितांकडून ३ लाख ७२ हजार रुपये किमतींचा ३१ किलो १३० ग्रॅम गांजा आणि कार असा ९ लाख ८७ हजार रुपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गोरले आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. संशयित रमेश शिंदे आणि समाधान यादव गांजा तस्करी करत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. आठवड्यापासून त्यांच्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा वॉच होता. गुरुवारी राजाराम तलाव परिसरात संबंधित तस्कर ग्राहकाच्या प्रतीक्षेत असताना सापळा रचून दोघांना ताब्यात घेण्यात आले. अंगझडती आणि कारची तपासणी केली असता त्यामध्ये गांजा साठा आढळून आला. संशयित आराेपींवर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.
दोघांची कसून चौकशी सुरू असून संबंधित गांजा कोठून आणि कोणासाठी आणला होता, याची चौकशी सुरू आहे. तस्करीच्या रकेटमध्ये शहरातील काही स्थानिक गुन्हेगारांचा सहभाग असावा, असाही संशय पोलीस निरीक्षक गोरले यांनी व्यक्त केला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta