बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आणि कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी शनिवार दि. १९ रोजी सकाळी सहा वाजल्यापासून ते सोमवार दि. २१ रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी संपूर्ण कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे.
या कालावधीत जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळता सगळे व्यवहार बंद राहणार आहेत. सकाळी सहा ते दहा या वेळेत देखील जीवनावश्यक वस्तूंची खरेदी जनतेला करता येणार नाही. सगळी दुकाने संपूर्ण लॉकडाऊन कालावधीत बंद राहणार आहेत.
सध्या दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. जिल्ह्यातील कोरोना संपूर्ण नियंत्रणात आणण्यासाठी म्हणून पुन्हा दोन दिवस संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.
संपूर्ण कडक लॉकडाऊन कालावधीत केवळ दूध आणि औषधाची दुकाने सुरू राहणार आहेत. दवाखाना, हॉस्पिटलला जाण्यासाठी परवानगी आहे. रयत सेवा केंद्रे शेतकऱ्यांना बी बियाणे आणि खत खरेदी करण्यासाठी दुपारी बारा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.