मुंबई: राज्यसभा निवडणुकीच्या सहाव्या जागेवरुन सुरु असलेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय हालचालींना वेग येताना दिसत आहे. संभाजीराजे राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवण्यावर ठाम असल्याने शिवसेनेने सहाव्या जागेसाठी पर्यायी उमेदवाराची निवड केल्याची चर्चा आहे. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांनी निर्णायक हालचाली करायला सुरुवात केली आहे. त्यासाठी संभाजीराजे हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत, अशी माहिती समोर आली आहे. आता संभाजीराजे मुंबईत आल्यानंतर काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरातील जिल्हाप्रमुख संजय पवार यांचे नाव निश्चित केल्याची माहिती शिवसेनेच्या गोटातून पुढे येत आहे. याविषयी अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, सहाव्या जागेवर शिवसेनेने उमेदवार जाहीर केल्यास संभाजीराजे छत्रपती यांचे सर्व पर्याय संपल्यात जमा असतील. त्यानंतर संभाजीराजे हे अपक्ष म्हणून निवडणुकीला उभे राहिले तरी त्यांची निवडून येण्याची शक्यता फारच कमी असल्याचे बोलले जाते. त्यामुळे आता संभाजीराजे मुंबईत आल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे किंवा अन्य कोणत्या नेत्याला भेटणार का? त्यानंतर राज्यसभेच्या सहाव्या जागेचा उमेदवारीचा तिढा सुटणार का, हे पाहावे लागेल.
Belgaum Varta Belgaum Varta