मुंबई : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी येत्या 10 जून रोजी मतदान होणार आहे. राज्यसभेच्या या सहा जागांसाठी सात उमेदवारांनी अर्ज दाखल केला. भाजपनं तिसरा अतिरिक्त उमेदवार रिंगणात उतरवलाय. सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात उतरल्यानं निवडणूक होणार दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील नेत्यांच्या शिष्टमंडळानं काल (03 जून 2022) भाजप नेते आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव दिला. परंतु, भाजपनं निवडणूक लढण्याचा निश्चय पक्का केल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून ते भाजपवर बरसल्याचं पाहायला मिळालं.
संजय राऊत यांनी नुकताच प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री मॅच्युअर असायला पाहिजे. महाविकास आघाडीतील नेत्यांच्या शिष्टमंडळानं भाजप नेते आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मात्र, त्यांनी निवडणूक लढण्याचा निश्चय पक्का केलाय. अशावेळी कोणी कोणाला रोखू शकत नाही. महाविकास आघाडी सुद्धा सत्तेवर आहे. आम्ही पण ताकदीनं सत्तेवर उतरलेलो आहोत. प्रश्न सहाव्या जागेचा आहे. भाजप अपक्ष आणि इतर पक्षांवर अवलंबून आहे. ते त्यांना आमिष आणि प्रलोभन दाखवणार. त्यांच्यावर दबाव कशाप्रकारे आणला जातोय? याची माहिती आमच्याकडं रोज येतेय. कारण ज्यांच्यावर दबाव आणले जातायेत ते आमचेही मित्र आहे. ईडी आणि जुनी प्रकरणं आणि केंद्राच्या अखत्यारीत येणारी प्रकरणं उकरुन काढत त्रास दिला जातोय. यात भाजपचे चारित्र्य उघडं होतंय.
कोण कोणासोबत आहे? हे 10 जूनला कळणार
राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे चार उमेदवार आहे. सहाव्या जागेसाठी सर्वांच्या मनात काही प्रश्न उपस्थित होत आहेत. त्या जागेवर असलेले उमेदवार बहुमतांनी विजय मिळवून राज्यसभेतही जातील. आम्ही निवडणुक टाळण्याचा प्रयत्न केला. पण भाजपला त्यांच्या अधिकारांचा गैरफायदा घेऊन महाराष्ट्राचं वातावरण खराब करायचं आहे. आम्ही सत्तेवर आहोत, हे तुम्ही विसरू नका. कोण कोणाबरोबर आहे हे 10 जूनला कळेल. तुम्ही आत्ताच का पत्ते पिसत आहात. बहुजन विकास आघाडी कुठे आहे? एमआयएम कुठे आहे? बच्चू कडू आणि आमदार कुठे आहे? हे 10 तारखेलाच कळेल, असंही संजय राऊतांनी म्हटलं आहे.
Check Also
भाजपची 22 जणांची दुसरी उमेदवार यादी जाहीर
Spread the love मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून दुसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली …