मुंबई : विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. काँग्रेसने दोन्ही जागांवर मुंबईकरांना संधी दिली आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. संख्याबळानुसार काँग्रेसचा एक उमेदवार सहज विजयी होणार आहे. तर, दुसर्या जागेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससह इतरांची मदत काँग्रेसला घ्यावी लागणार आहे.
काँग्रेसकडून विधान परिषदेवर कोणाला संधी मिळणार याबाबत अनेक चर्चा सुरू होत्या. महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांच्या नावाचीही चर्चा सुरू होती. मात्र, काँग्रेस नेतृत्वाने भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना संधी दिली. काँग्रेसकडून मराठा आणि अनुसूचित जाती घटकातील उमेदवारांना संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
चिंतन शिबिरातील संकल्प हवेतच?
नव्या चेहर्यांना संधी देण्याबाबत काँग्रेसच्या चिंतन शिबीरात ठरवण्यात आले होते. मात्र, विधान परिषद निवडणुकीत हे चित्र दिसून आले नसल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे हे दोघेही 65 वर्षांचे आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta