मुंबई : मुंबई पोलिसांनी दहशतवादी याकुब मेमनच्या कबरीवर कारवाई केली आहे. कोविड काळात मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण करण्यात आलं होतं. यावरून वाद झाला आणि त्यानंतर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत कबरीवरील एलईडी लाईट्स काढून टाकल्या.
दक्षिण मुंबईतील मरिन लाईन्स परिसरातील बडा कब्रिस्तानमध्ये मेमनची कबर आहे. या कबरीला मार्बल्स आणि एलईडी लाईट्स लावण्यात आले होते. फुलांच्या पाकळ्यांनी ही कबर सजवण्यात आली. ही जागा ‘बेरियल वक्फ बोर्डा’च्या अख्यत्यारीत येते.
यावरून भाजपा नेते राम कदम यांनी याकुब मेमनच्या कबरीचे फोटो ट्वीट करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. हे उद्धव ठाकरेंच्या आशिर्वादाने घडतंय की मुंबई प्रेमातून? असा खोचक सवाल कदम यांनी विचारला. महाविकासआघाडी सरकारच्या काळात या कबरीचे सुशोभीकरण करण्यात आले, असा आरोप कदम यांनी केला. उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यासाठी माफी मागावी, अशी मागणी कदम यांनी केली.
1993 साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात आर्थिक सहभाग आढळल्यानंतर याकुब मेमनला न्यायालयाने दोषी ठरवले होते. क्षमायाचनेच्या याचिका फेटाळल्यानंतर याकुबला नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात 30 जुलै 2015 रोजी फाशीची शिक्षा देण्यात आली होती. या बॉम्बस्फोट प्रकरणात याकुबचा भाऊ टायगर मुख्य संशयित आरोपी आहे. मुंबई बॉम्बस्फोटात 257 जणांनी आपला जीव गमावला होता. जवळपास 1400 हून अधिक नागरिक या स्फोटात जखमी झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta