मुंबई : गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्रात सीमाप्रश्नावरून मोठा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. दोन्ही राज्यांमधील नेतेमंडळींकडून यासंदर्भात आक्रमक विधानं केली जात आहेत. हा वाद विकोपाला गेल्यानंतर थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मध्यस्थी करून जैसे थे परिस्थिती ठेवण्याचं आवाहन केलं. मात्र, त्यानंतरही कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राच्या कुरापती काढणं सुरूच ठेवलं आहे. त्यावरून राज्यातील विरोधकांनी सत्ताधार्यांना घेरायला सुरुवात केली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे.
यांच्या तीन महिन्यांपूर्वीच्या क्रांतीचे हे परिणाम
तीन महिन्यांपूर्वी त्यांनी जी क्रांती महाराष्ट्रात केली, त्या क्रांतीचाच एक भाग कर्नाटकात दिसतोय. बोम्मई काय म्हणतायत त्यापेक्षा महाराष्ट्र काय म्हणतोय हे महत्त्वाचं आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यासंदर्भात बोटचेपी भूमिका घेतायत. गृहमंत्री अमित शाह यांनी मध्यस्थी केली म्हणजे काय केलं? जैसे थे परिस्थिती म्हणजे काय? कर्नाटकचे मुख्यमंत्री जे बोलतायत, त्यावर तुम्ही काही भूमिका मांडणार आहेत की नाही? असा सवाल संजय राऊतांनी यावेळी उपस्थित केला.
हे महाराष्ट्राचं दुर्दैवं आहे
एक इंचही जमीन देणार नाही आणि महाराष्ट्रातल्या जागांवरचा हक्क सोडणार नाही असं कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणतात. इतकी बेअब्रू महाराष्ट्राची गेल्या 70 वर्षांत कधी बाजूच्या राज्यांनी केली नव्हती. सीमाप्रश्न जरी जुना असला, तरी एकमेकांच्या राज्याविषयी आदर ठेवून हा संघर्ष सुरू होता. दोन्ही राज्य एकाच देशाचे घटक आहेत. तरी बोम्मईंची भाषा अशी आहे. दोन्हीकडे भाजपाचे नेते आहेत. तरी रोज उठून बोम्मई महाराष्ट्राच्या कानफडात मारतायत आणि मुख्यमंत्री गाल चोळत विधानसभेत जातात. हे महाराष्ट्राचं दुर्दैवं आहे, अशा शब्दांत संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीकास्र सोडलं.