
तहसीलदारांना निवेदन : विविध पक्षांचा पाठिंबा
निपाणी (वार्ता) : यंदाच्या हंगामातील ऊसाला साखर कारखान्या तर्फे प्रति टन ३ हजार ५०० रुपये आणि शासनाकडून २ हजार रुपये असे एकूण साडेपाच हजार रुपये मिळाले पाहिजेत. अतिवृष्टी आणि महापूर काळात नुकसान झालेल्या पिकांचा निपक्षपातीपणे सर्वे करून नुकसान भरपाई मिळावी. पावसामुळे पडलेल्या घरांचा सर्वे करून सर्वसामान्य कुटुंबांना घरे मिळावीत यासह विविध मागण्यासाठी चिकोडी जिल्हा रयत संघटनेतर्फे निपाणीत मोर्चा काढून बेळगाव विधानसभेवर धडक देण्यात आली. यावेळी निपाणीतील तहसीलदार कार्यालयाला संघटनेचे चिकोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार व मान्यवरांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व धजनतर्फे पाठिंबा देण्यात आला.
प्रारंभी येथील राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवनाजवळ निपाणी, चिकोडी परिसरातील रयत संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र जमले.
तेथून मोर्चाद्वारे धर्मवीर संभाजी चौकात जाऊन मानवी साखळी केली. येथे धर्मवीर संभाजी राजे यांच्या प्रतिमेस धजदचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, राजू पोवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
त्यानंतर साखरवाडी, नगरपालिका कार्यालय, बेळगाव नकामार्गे तहसीलदार कार्यालयावर मोर्चा धडकला.
या ठिकाणी राजू पोवार यांनी, शेतकऱ्यांच्या मागणीकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे विधान सौधला घेरावा घालण्यात येणार आहे. कारखानदारांची एकजूट झाली असून शेतकऱ्यांनीही एकजूट केली पाहिजे. बेळगाव येथे आपल्या मागण्या मान्य न झाल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. तहसीलदार कार्यालयातील अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून वरिष्ठाकडे पाठवण्याचे आश्वासन दिले.
त्यानंतर संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी बेळगावकडे रवाना झाले.
मोर्चामध्ये रमेश पाटील, नामदेव साळुंखे, संजू नाईक, शिवाजी वाडेकर, सुभाष चौगुले, एकनाथ सादळकर, बबन जामदार,कुमार पाटील, अशोक पाटील, बाबासाहेब पाटील, संजय पोवार, अनंत पाटील, सदाशिव शेटके चीनु, कूळवमोडे, बाळासाहेब पाटील, शितल सूर्यवंशी, यांच्यासह चिकोडी जिल्ह्यातील विविध गावातील रयत संघटनेचे पदाधिकारी आणि शेतकरी सहभागी झाले होते.
—
विविध पक्षांचा पाठिंबा
रयत संघटनेच्या मोर्चाला धजदचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, सुनिता व्होनकांबळे, माजी आमदार काकासाहेब पाटील, राष्ट्रवादी पक्षाचे, जावेद काझी यांच्यासह विविध नेते आणि कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला.