शिर्डी (अहमदनगर) : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार कार्यक्षम नेते आहेत. नागरिक त्यांचा गांभीर्याने विचार करतात. त्यामुळे त्यांनी युतीमध्ये यावे, अशी खुली ऑफर राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शिर्डीत माध्यमांशी बोलताना दिली. मंत्री केसरकर आज (शुक्रवारी) श्री साईबाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आले असता माध्यमांशी बोलत होते. या वेळी श्री साईबाबा संस्थानने त्यांना शाल व श्री साईबाबांची उदी देऊन सत्कार केला. मंदिरप्रमुख रमेश चौधरी उपस्थित होते.
मंत्री केसरकर म्हणाले, अजित पवार कार्यक्षम नेते आहेत. त्यांनी युतीत यावं. त्यांचं राष्ट्रवादीत काय होत आहे, हे सर्वांना माहिती आहे. ते काही वेगळे सांगण्याची गरज राहिली नाही. त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. दादा जबाबदार नेते आहेत. ते बोलतात तेव्हा लोक त्यांना गांभीर्याने घेतात. त्यांच्या कार्यक्षमतेचा फायदा जनतेला झाला पाहिजे. यासाठी त्यांनी युतीत यावे.