मुंबई : शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावरील निकाल जाहीर होण्यास अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दुपारी चार वाजता निकालाचे वाचन करणार आहेत. हा निकाल सहा भागांत असणार असून एकूण ३४ याचिकांवर हा निकाल असणार आहे. दरम्यान निकालापूर्वी सकाळी दहा वाजता मंत्रिमंडळाची बैठक बोलवण्यात आली आहे. तसेच निकालच्या पूर्वसंध्येला हालचाली वाढल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘वर्षा’ निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तसेच राज्याच्या नव्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला ‘वर्षा’ बंगल्यावर आल्या होत्या.
असा विभागला जाणार निकाल
शिवसेनेसंदर्भात ३४ याचिका विधानसभा अध्यक्षांपुढे दाखल झाल्या होत्या. सर्व याचिकांचा निकाल सहा भागांत विभागून देण्यात येणार आहे. ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेची केली मागणीवर पहिल्या भागात निकाल असणार आहे. निकालाचा दुसरा भाग सुनील प्रभू यांनी तीन अपक्ष आमदारांच्या अपात्रतेसाठी केलेल्या यचिकेवर असणार आहे. सुनील प्रभू यांनी योगेश कदम आणि शिदें गटातील १८ आमदारांना अपात्र करण्याबाबत केलेली याचिकेवर तिसरा भाग असणार आहे. विधानसभा अध्यक्ष निवडीचा व्हिपचा भंग केल्याबद्दल एकनाथ शिंदे आणि ३९ आमदारांना अपात्र ठरवण्याची सुनील प्रभू यांनी केलेली मागणी चौथ्या भागात असणार आहे. सुनील प्रभू यांनी विश्वासदर्शक ठरावाबाबतच्या व्हिपचा भंग केल्याबद्दल एकनाथ शिंदे यांच्यासह ३९ जणांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. त्यावर पाच भाग असणार आहे. सहावा भाग व्हिपचे उल्लंघन केल्याबद्दल ठाकरे गटातील १४ आमदारांना अपात्र ठरवण्याचा असणार आहे. यासंदर्भात शिवसेनेचे भरत गोगावले यांनी याचिका दाखल केली होती.
विधानसभा अध्यक्ष काय निर्णय देणार?
शिवसेना पक्षात फूट पडल्यापासून राज्यातील राजकारणाची चर्चा सुरु आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला होता. या निर्णयात आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्षांना घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याप्रकरणी सुनावणी घेतली. त्यांनी दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतले. साक्षीदार आणि पुरावे तपासले. त्यानंतर आज दुपारी चार वाजता अंतिम निकाल देणार आहे.