मुंबई : राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांची आज ईडी चौकशी होणार असून ते कार्यालयात दाखल झाले आहेत. बारामती ॲग्रो कारखाना प्रकरणी रोहित पवार ईडीच्या रडारवर असून आज त्याचप्रकरणी त्यांची चौकशी होत आहे. त्यापूर्वी ते सकाळी हॉटेल ट्रायडेंट मधून विधिमंडळात गेले आणि तेथे थोर पुरुषांच्या फोटोला अभिवादन केले. त्यानंतर ते राष्ट्रवादीच्या कार्यालयात पोहोचले. तेथे त्यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे यांची तसेच अनेक कार्यकर्त्यांची भेट घेतली. तेथून ते ईडी कार्यालयात चौकशी साठी रवाना झाले. सुप्रिया सुळेही त्यांच्यासोबत आहेत.
रोहित पवार हे एकटे नाहीत, त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले. जामखेड, बारामती, पुणे येथून हजारो कार्यकर्ते काल रात्रीपासन मुंबईत दाखल असून त्यांनी रोहित पवार यांच्या समर्थनार्थ विविध घोषणा दिल्या.’एकच वादा रोहित दादा’ अशा जोरदार घोषणा देत कार्यकर्त्यांनी रोहित पवरा यांना पाठिंबा दर्शवला. एवढेच नव्हे तर बलार्ड पियर परिसरात ठिकठिकाणी रोहित पवारांसाठी बॅनर लावण्यात आले. ‘पळणारा नाही तर लढणारा दादा ‘ असे बॅनर वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात आले. तसेच ईडी कार्यालय परिसरात दडपशाहीच्या कारवाईचा निषेध असे लिहिलेले बॅनरही लावण्यात आले.
शरद पवारांचा पाठिंबा
दरम्यान रोहित पवार ईडी कार्यालयात जाताना त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे त्यांच्या सोबत आहेत. तर त्यापूर्वी त्यांनी पक्ष कार्यालयात जाऊन आजोबा शरद पवार यांचे आशिर्वादही घेतले. त्यांनी रोहित पवार यांना यशवंतराव चव्हाण यांचं पुस्तक भेट दिलं. दरम्यान रोहित पवार यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत शरद पवार हे पक्ष कार्यालयातच थांबणार आहेत.
मी लढत राहणार
मी मराठी माणूस आहे, घाबरणार नाही. चौकशीला सहकार्य करणार असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले. ईडी अधिकाऱ्यांनी मागितलेली सर्व माहिती, कागदपत्रं आम्ही दिलेली आहेत. या मागे काय विचार, कुठली शक्ती हे आजतरी सांगत येणार नाही. अधिकारी त्यांच काम करत आहेत.
पण आम्ही सामान्य व्यक्तींच्या वतीने एका बलाढ्य शक्तीच्या विरोधात आवाज उठवत आहोत. कदाचित त्यामुळेच ही कारवाई असावी असं लोकांचं मत आहे, असं रोहित पवार म्हणाले. चूक केली नसेल तर घाबरायचं कारण काय असा सवालही त्यांनी विचारत चौकशीला घाबरत नसल्याचं स्पष्ट केलं.
कार्यकर्त्यांकडून निषेध, ओढले आसूड
रोहित पवार यांच्या समर्थनासाठी कर्जत जांबखेड मतदार संघातून अनेक सर्वसामान्य कार्यकर्ते राष्ट्रवादी भवनासमोर जमले आहेत. सकाळ पासून कार्यकर्ते आक्रमक झाले असून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. डोक्यावर टोपी, गावठी पोशाख, घालून सरकार हमसे डरती है, ईडी को आगे करती है अशा घोषणा ही दिल्या जात आहेत. सरकार आणि केंद्र सरकारविरोधातील रोष व्यक्त करण्यासाठी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली तसेच राष्ट्रवादी भवन समोर आसूड ओढत ईडीचा निषेधही कार्यकर्त्यांकडून करण्यात आला.
दरम्यान ईडी कार्यलयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. तसेच मुंबई पोलिसांच्या दंगल नियंत्रण पथकाच्या टीमही तैनात करण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक होण्याची शक्यता असल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला.