मुंबई : काँग्रेसच्या गोटातून मोठी बातमी… राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्रथम सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना अशोक चव्हाण यांनी पत्र लिहिलं आहे. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा रादीनामा दिला आहे. मागच्या काही दिवसांपासून अशोक चव्हाण काँग्रेस पक्षात नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. शिवाय अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील, अशीही चर्चा होत होती. अशातच आता अशोक चव्हाण आजच भाजपत प्रवेश करण्याची शक्यता आहे. काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याचं पाहायला मिळत आहे.
अशोक चव्हाण यांच्या पत्रात काय?
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र लिहित अशोक चव्हाण यांनी आपल्या काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला. मी दिनांक 12 फेबुवारी 2024 मध्यान्हानंतरपासून माझ्या इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा याद्वारे सादर करीत आहे, धन्यवाद, असं अशोक चव्हाण यांनी या पत्रात म्हटलं आहे. अशोक चव्हाण यांनी राजीनाम्याचं जे पत्र लिहिलं आहे. यावर माजी विधानसभा सदस्य, भोकरदन विधानसभा मतदारसंघ असा उल्लेख आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचाही राजीनामा दिला असल्याचं स्पष्ट होत आहे.
काही वेळाआधी अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. तेव्हा राजीनामा देण्याची प्रक्रिया समजून घेतली. त्यानंतर त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अशोक चव्हाण यांचा राजीनामा स्विकारला आहे. त्यामुळे मागच्या कित्येक दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चांना आता दुजोरा मिळाला आहे. अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.