मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावर चर्चा करण्यासाठी आज पुन्हा एकदा महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक होणार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी ही बैठक होणार असून तिला राष्ट्रवादी (पवार गट) पक्षाचे प्रमुख शरद पवार हेदेखील उपस्थित राहणार आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी आज महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला महाविकास आघाडीचे सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. संध्याकाळी 5 वाजता ही बैठक होणार असून ती निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
ठाकरेंची शिवसेना उद्या उमेदवार जाहीर करणार, आजच्या बैठकीला महत्त्व
गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये अनेक जागांवर वाद आहे. याच जागांवर तोडगा काढण्यासाठी मविआच्या घटकपक्षांत अनेक बैठका झाल्या आहेत. या बैठकांनंतर काही जागांवरील वाद मिटवण्यात मविआला यशही आले आहे. आज पुन्हा एकदा संध्याकाळी पाच वाजता मविआची बैठक होणार आहे. या बैठकीला शरद पवारांसह इतर प्रमुख नेत उपस्थित असणार आहेत. 26 मार्च रोजी शिवसेना आपल्या 15 ते 16 उमेदवारांची यादी जाहीर करणार आहे. त्यामुळे आजची ही बैठक निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा अद्याप पूर्णपणे मिटलेला नाही. मात्र काँग्रेसने आपल्या वाटाच्या 12 जागांवर अगोदरच उमेदवार जाहीर केले आहेत.