नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेच्या (जेएनयू स्टुडंट युनियन) चार वर्षानंतर झालेल्या निवडणुकीत डाव्या विद्यार्थी संघटनांच्या संयुक्त आघाडीने संघ-भाजपशी सलग्न असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा पराभव करत दबदबा कायम राखला. डाव्या विद्यार्थी संघटनांच्या विजयानंतर रविवारी रात्री ‘जेएनयू’मध्ये जल्लोषाचे वातावरण होते. ‘जय भीम’, ‘लाल सलाम’च्या घोषणांनी विद्यापीठ दणाणून गेले होते.
या निवडणुकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष, महासचिव आणि सह-महासचिव ही चारही पदे डाव्या आघाडीने जिंकली असून तब्बल ३० वर्षांनंतर विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी दलित उमेदवारांची निवड झाली आहे. ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनचे (आयएसा) धनंजय यांनी (२ हजार ५९८ मते) ‘अभाविप’च्या उमेश अजमेरा यांचा (१ हजार ६७६ मते) पराभव केला. यापूर्वी १९९६-९७ मध्ये दलित समाजील भट्टीलाल बैरवा ‘जेएनयू’च्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष झाले होते. बिहारमधील गया येथील धनजंय ‘जेएनयू’मध्ये पीएचडी करत आहेत. निवडणूक प्रचारामध्ये विद्यापीठाच्या निधी पुरवठ्यामध्ये झालेली कपात आणि शुल्कवाढीचा मुद्दा अत्यंत प्रभावी ठरला.
‘बिरसा आंबेडकर फुले स्टुडंट्स असोसिएशन’च्या (बापसा) प्रियांशी आर्य यांनी डाव्या आघाडीच्या मदतीने महासचिवपदासाठी झालेल्या निवडणुकीत विजय मिळवला. प्रियांशी यांनी (२ हजार ८८७ मते) ‘अभाविप’च्या अर्जुन आनंद यांचा (१ हजार ९६१ मते) ९२६ मतांनी पराभव केला. डाव्यांच्या आघाडीचे उपाध्यक्षपदासाठी अविजित घोष (एसएफआय) आणि सह-महासचिवपदासाठी मोहम्मद साजिद (एआयएसएफ) विजयी झाले.
‘जेएनयू’मधील डाव्या विद्यार्थी संघटनांच्या आघाडीमध्ये ‘ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन’ (आयसा), डेमोक्रॅटिक स्टुडंट्स फेडरेशन (डीएसएफ), स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) आणि ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (एआयएसएफ) यांचा चार संघटनांचा समावेश होता. २०१५ मध्ये ‘अभाविप’ने सह-महासचिव पदावर विजय मिळवल्यानंतर डाव्या विद्यार्थी संघटनांनी २०१६ मध्ये आघाडी करून विद्यार्थी संघटनेच्या निवडणुका लढवल्या. मतांचे विभाजन टाळत या डाव्यांच्या आघाडीने ‘जेएनयू’मध्ये संघ-भाजपशी निगडीत ‘अभाविप’चा कब्जा होऊ दिला नाही.
‘अभाविप’ने २००० मध्ये फक्त एकदाच अध्यक्षपद काबीज केले होते. त्यानंतर २४ वर्षांनंतरही त्यांना अध्यक्षपद मिळू शकले नाही. २०१५-१६ मध्ये ‘अभाविप’ला सह-महासचिवपद जिंकता आले होते. त्यानंतर डाव्यांच्या ऐक्यामुळे उजव्या विचारांच्या या संघटनेला चारपैकी एकही महत्त्वाचे पद मिळवता आले नाही. २०१९ मध्ये ‘एसएफआय’च्या आयशी घोषने अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली होती.
कोरोनानंतर ‘जेएनयू’मध्ये गेली चार वर्षे विद्यार्थी संघटनेची निवडणूक झाली नव्हती. त्यामुळे आत्ता झालेल्या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले होते. ‘जेएनयू’मधील डाव्या विचारांचा पगडा मोडून काढण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न होत असल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. या पार्श्वभूमीवर डाव्या विद्यार्थी संघटनांनी मिळवलेला विजय महत्त्वाचा मानला जात आहे. इतकेच नव्हे तर २२ मार्च रोजी विक्रमी मतदान झाले होते. १२ वर्षांनंतर ‘जेएनयू’च्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत सर्वाधिक ७३ टक्के मतदान झाले. २०१९ मध्ये ६७.९ टक्के मतदान झाले होते. यावेळी ७ हजार ७५१ मतदारांपैकी ५ हजार ६५६ विद्यार्थ्यांनी मतदान केले. १७ मतदान केंद्रे तयार केली होती. प्रमुख चार पदांसाठी एकूण १९ उमेदवार रिंगणात होते. त्यातील अध्यक्षपदासाठी ८ उमेदवारांमध्ये लढत झाली.