
चारा टंचाईसह पशुखाद्य दरवाढीचा फटका
निपाणी (वार्ता) : वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे दुधाळ जनावरांना मोठा फटका बसत असून दुग्ध उत्पादनातही लक्षणीय घट होत असल्याचे चित्र निपाणी परिसरात दिसून येत आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जनावरे चारा कमी खात असल्याने तसेच उष्णतेमुळे त्यांच्या अंगाची लाही लाही होत असल्याने दुधावर थेट परिणाम होत आहे.
तापमानात वाढ झाल्यामुळे म्हशी व वासरे दिवसभर झाडांच्या सावलीत विसावत आहेत. शेतातील झाडांच्या आडोशाला कळप थांबलेले दिसून येत असून त्यांना थंडावा मिळावा, यासाठी शेतकरी विविध उपाययोजना करत आहेत. काही ठिकाणी जनावरांसाठी पाण्याची टाकी, ओलसर जागा तसेच हिरवा व सुक्या चाऱ्याची सोय करण्यात येत आहे. उन्हाळ्यात चाऱ्याचे प्रमाण घटल्याने आणि उपलब्ध चाऱ्याची गुणवत्ता कमी झाल्याने दुग्ध उत्पादनावर परिणाम होत आहे. शिवाय पशुखाद्य दरवाढीचा फटकाही बसत आहे. यामुळे दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
काही भागांत हिरव्या चाऱ्याची टंचाईही जाणवत आहे.दरम्यान उन्हाळ्यात जनावरांना पुरेशा प्रमागात स्वच्छ व थंड पाणी देणे, दिवसातून दोन ते तीनवेळा अंघोळ घालणे, सावलीची योग्य व्यवस्था करणे आणि संतुलित आहार देणे अत्यावश्यक आहे. तसेच खनिज मिश्रण व मीठ लिंक देण्याचा सल्लाही शेतकऱ्यांना देण्यात येत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta