Saturday , June 20 2026
Breaking News

22 जूनच्या कन्नडसक्ती मोर्चाला कर्नाटक प्रशासनाचा नकार; कायदा-सुव्यवस्थेचे दिले कारण

Spread the love

 

बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आयोजित 22 जून रोजीच्या कन्नडसक्ती आंदोलनाला कर्नाटक प्रशासनाने परवानगी नसल्याचे पत्रकाद्वारे कळविले आहे.
धर्मवीर संभाजी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर प्रस्तावित सार्वजनिक मोर्चा व रॅली काढण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. दिनांक ८ जून २०२६ रोजी मध्यवर्ती म. ए. समितीच्या वतीने सादर करण्यात आलेल्या अर्जाचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.

प्रशासनाच्या पत्रानुसार सदर मोर्च्यामुळे शहरातील विविध भाषिक समुदायांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता असून सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून परवानगी नाकारण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

याशिवाय, संबंधित संघटनेच्या काही सदस्य व पदाधिकाऱ्यांविरुद्ध यापूर्वी बेकायदेशीर आंदोलने, सार्वजनिक मार्गात अडथळा निर्माण करणे, घालून दिलेल्या अटींचे उल्लंघन करणे आणि शांतता भंग करण्यासंदर्भातील गुन्हे नोंद झाल्याचा उल्लेखही पत्रात करण्यात आला आहे. अर्जाचा विचार करताना या पूर्व इतिहासाचाही विचार करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
मोर्चाचा मार्ग शहरातील अतिवर्दळीच्या आणि संवेदनशील भागातून जात असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच रुग्णवाहिका व इतर आपत्कालीन सेवांच्या हालचालींमध्ये अडथळा निर्माण होऊन सर्वसामान्य नागरिकांना गैरसोय होण्याची भीती प्रशासनाने व्यक्त केली आहे.

कर्नाटक पोलीस अधिनियम, १९६३ तसेच सार्वजनिक सभा व मोर्चांचे नियमन करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आधार घेत सार्वजनिक सुव्यवस्था, सुरक्षितता आणि जनहित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

अमित शाह यांच्या भेटीसाठी निघालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना हत्तरगी टोलवर अडवले; महामार्गावर ठिय्या आंदोलन

Spread the love  बेळगाव : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांची भेट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *