पश्चिमेकडून वाहतूकीचा मार्ग मोकळा : वेदगंगा नदीकाठ राहणार सुरक्षित
निपाणी (वार्ता) : पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गाचे सहा पदरीकरणाचे काम सुरू आहे. मांगुर फाट्यानजीक वेदगंगा नदीवरील पुल हा सीमाभागातील शेतकऱ्यांसह नागरिकांच्या चिवट लढ्यामुळे भरावा ऐवजी पिलरचा होत आहे. सध्या हे काम युद्धपातळीवर सुरू असून पावसाची साथ मिळाल्यास येत्या पावसाळ्यापूर्वी पश्चिमेकडील बाजूची पिल्लर उभारणीचे काम पूर्ण होऊन या बाजूने वाहतूकही सुरू होणार आहे.
सध्यापाऊस लांबल्यामुळे कामास गती आली आहे.२ महिन्यात पश्चिमेकडील सेवा रस्ता २ लाइन व मेन कॅरेज ३ लाइन पदरी असे पूर्ण होणार असल्याचे अवताडे कंपनी अधिकारी राज पाटील यांनी सांगितले.
पश्चिमेकडील काम पूर्ण होतास वाहतूक वळवून नंतर पूर्वेकडील बाजूचे काम हाती घेण्यात येणार आहे. वरील कामासाठी लागणारे आडव्या पिलरचे काम तिथेच बांधण्यास प्रारंभ केला आहे. लवकरच हे काम पूर्ण होणार आहे. वेदगंगा कृती समिती तर्फे वेळोवेळी पाठपुरावा करून पिलर पुलाची निर्मिती केली जात आहे. पिलर खालील भराव संदर्भात काही त्रुटी असल्यास कल्पना दिल्या आहेत.
वेदगंगानदीपासून उत्तरेला एक हजार फुट (३००मीटर) पिल्लर उभारुन पूल बांधण्याचा आदेश राष्ट्रीय राजमार्ग मंत्रालयाने दिला आहे. यासाठी सुमारे ७० कोटी रुपयाच्या जादा निधीचीही तरतूद केली आहे. हा राष्ट्रीय महामार्ग बनविताना घातलेल्या भरावानंतर आता पुन्हा सुमारे १० ते १२ फुटापर्यत भराव करण्यात येणार होता. त्यामुळे पुराच्या पाण्याच्या विसर्गाला अडथळा निर्माण होवून महामार्गाच्या पश्चिमेकडील नदीकाठावरील सुमारे २० गावातील शेतीसह गावे जलमय होण्याची शक्यता होती. त्यामुळे बोरगाव येथील सहकारत्न उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखाली सीमाभागातील शेतकऱ्यांनी माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेतली. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला आहे. सध्या आधुनिक मशनरीद्वारे पश्चिम बाजूच्या पिल्लर उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. एका बाजूला १३पिल्लर असून एकूण ५२ पिल्लर निर्माण करण्यात येणार आहेत. पिल्लर उभे झाल्यावर येथील भराव हटविला जाणार आहे.यावेळी के. डी. पाटील, शेखर सावंत, शिवाजी पाटील-बानगे, अजित पाटील,नानासाहेब पाटील, अमोल पाटील, शिवाजी पाटील, विनायक लोहार,सुदीप वाळके, दिपक पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
—–
दोन्ही बाजूला दिशादर्शक फलक लावा
पुलाचे काम सुरू असल्याने वाहतूक वळवली आहे. या दरम्यान गेल्या महिन्यात म्हाकवे येथील युवकाचा अपघात होवून जीव गेला होता. त्यामुळे दोन्ही बाजूला दिशादर्शक फलक तसेच रिफ्लेक्टर लावावेत अशा सुचनाही कृती समितीने ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
—
Belgaum Varta Belgaum Varta