बेळगाव : निसर्गरम्य पर्यटनस्थळांवर मद्यपान, हुल्लडबाजी आणि पर्यावरणाची हानी करणाऱ्या प्रकारांमध्ये वाढ होत असल्याने राकसकोप धरण परिसरात पार्ट्या करण्यास ग्रामस्थांनी सक्त बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे उल्लंघन करताना आढळणाऱ्यांवर ५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.
यापूर्वी हजगोळी येथील निसर्गरम्य चाळोबा मंदिर परिसरात पर्यटकांच्या अनियंत्रित वावरामुळे ग्रामस्थांनी प्रवेशबंदीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर राकसकोप धरण परिसरात पार्टी करण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली होती. त्यामुळे हजगोळीच्या पावलावर पाऊल ठेवत राकसकोप ग्रामस्थांनीही कठोर भूमिका घेतली आहे.
शुक्रवारी राकसकोप ग्रामस्थ पंच कमिटी व ग्रामस्थांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत सर्वानुमते धरण परिसरात मद्यपान व पार्ट्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या निर्णयाची माहिती पोलिस प्रशासनालाही देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
बेळगाव शहरासह आसपासच्या भागातील अनेक युवक आणि पर्यटक राकसकोप धरण परिसरात पार्ट्यांसाठी येतात. मद्यपानानंतर हुल्लडबाजी करणे, रिकाम्या मद्याच्या बाटल्या धरण परिसर व शेतांमध्ये फोडून टाकणे, कचरा टाकून परिसर अस्वच्छ करणे असे प्रकार वारंवार घडत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली. यामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असून शेतात काम करताना फुटलेल्या काचांमुळे अनेकदा जखमी होण्याच्या घटनाही घडल्या आहेत.
याशिवाय मद्यधुंद अवस्थेत काही जणांकडून शेतात काम करणाऱ्या तसेच रस्त्याने ये-जा करणाऱ्या महिलांची छेडछाड केल्याच्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. मद्यपानातून होणारे भांडण-तंटे आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नही गंभीर बनत असल्याने ग्रामस्थांनी हा निर्णय घेतल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
दरम्यान, गावातील शांतता आणि सुरक्षितता कायम राखण्यासाठी किराणा व इतर दुकाने रात्री १० वाजेपर्यंत बंद ठेवावीत, अशी सूचनाही बैठकीत करण्यात आली. गावाच्या हितासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे निर्णय घेण्यात आल्याचे ग्रामस्थ पंच कमिटीने स्पष्ट केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta