Friday , November 22 2024
Breaking News

लोकसभेत कुणालाही पाठिंबा नाही, ज्यांना पाडायचं त्यांना पाडा; मनोज जरांगे पाटील

Spread the love

 

जालना : वेळ कमी पडल्याने गावा-गावातील मराठा समाजापर्यंत पोहोचता आले नाही. आलेले अहवाल अपुरे आहेत. त्यामुळे कोणाच्या हट्टापायी उमेदवार देवून समाजाला हरविण्याचे पाप मी करणार नाही. मी लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार उभे करणार नाही. कोणाला पाठींबा देणार नाही. मराठा आणि कुणबी एकच आहे. सगेसोयऱ्यांची अंमलबावणी करण्यासह इतर मागण्यांबाबत जे उमेदवार काम करतील त्यांना मतदान करा. तुम्हाला कोणाला पाडायचे ते पाडा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.

मनोज जरांगे पाटील यांनी गावा-गावातून आलेल्या अहवालावर चर्चा करण्यासाठी शनिवारी अंतरवाली सराटी येथे बैठक घेतली. दिवसभरात आलेल्या अहवालाचा अभ्यास करून लोकसभेसाठी उमेदवार न देण्याचा अंतिम सार काढला. आरक्षणासाठी महिलांवर लाठीहल्ला झाला. हजारो युवकांवर गुन्हे दाखल झाले. शेकडो युवकांचे बळी गेले. त्यामुळे ज्यांनी आमच्यावर अन्याय केला त्यांना धडा शिकविण्यासाठी निवडणूक लढवायची असे मत समाजाचे होते. त्यासाठी गावा-गावात जावून समाजाच्या मतांचा अहवाल आणा, असे सांगितले होते. परंतु, आलेला अहवाल अपुरा आहे. राजकारणापुढे मुख्य प्रश्न असलेले आरक्षण मागे पडत आहे. अनेक ठिकाणी गावखेड्यातील मराठ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी वेळ कमी पडला. आलेला अहवाल अपुरा आहे. त्यामुळे आरक्षण आणि लेकरांचे वाटोळे होवू नये यासाठी लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार द्यायचा नाही. आपण विधानसभेची तयारी आतापासूनच सुरू करू. आता तुम्हाला कोणाला मतदान करायचे ते करा. पण ज्यांचा करेक्ट कार्यक्रम करायचा तो करा, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले.

विविध जाती-धर्माच्या प्रतिनिधींनी घेतली भेट

वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यासह धनगर, मुस्लिम, मागासवर्गीय, लिंगायत व इतर अनेक समाजाच्या प्रतिनिधींनी आपली भेट घेवून लोकसभा निवडणुकीवर चर्चा केली होती. परंतु, ३० तारखेला मराठा समाजाचा येणारा अहवाल आणि त्यातील समाजाची मते पाहूनच आपण अंतिम निर्णय घेणार होतो. त्यामुळे आपण कोणालाही पाठींबा दिला नव्हता.

राजकारणाला कमी समजू नका

अपेक्षित अहवाल आला असता तर राजकारणातही आपण प्रतिडाव टाकले असते. परंतु, तो आला नाही. राजकारण आणि समाजकारण हे दोन्ही भाग वेगळे आहेत. राजकारणात समाज जाेडता आला पाहिजे. भावनेच्या आहारी जावून निर्णय घेता येत नाही. राजकारणाचे गणित वेगळे आणि समाजकारणाचे गणित वेगळे असते. राजकारणात प्रत्येक मतदाराची मने जिंकावली लागतात. त्यांच्या प्रश्नाला हात घालावा लागतो. राजकारण सोपे समजू नका आणि त्यामुळेच आपण जात हारू नये म्हणून हा निर्णय घेत असल्याचेही जरांगे पाटील म्हणाले.

About Belgaum Varta

Check Also

भाजपची 22 जणांची दुसरी उमेदवार यादी जाहीर

Spread the love  मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून दुसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *