रयत संघटनेच्या मागणीची दखल; प्रत्येक शेतकऱ्याला २० किलो चारा
निपाणी (वार्ता) : निपाणी आणि चिक्कोडी तालुक्यात उन्हाळ्यात चारा आणि पाण्याची टंचाई भासत आहे. याबाबत रयत संघटने तर्फे तहसीलदारांना निवेदन देऊन आंदोलन करण्यात आले होते. त्याची दखल घेऊन प्रशासनातर्फे बेळकुड येथून शेतकऱ्यांना चारा देण्यास प्रारंभ करण्यात आला. प्रत्येक शेतकऱ्याला २० किलो चारा देण्यात येणार आहे.
गेल्या महिन्यापासून उन्हाची तीव्रता वाढल्याने चारा पाण्याची समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे जनावरांचे हाल होत होते. त्यामुळे संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार, राज्याध्यक्ष चुन्नाप्पा पुजारी यांचा नेतृत्वाखाली तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन छेडून निवेदन दिले होते. तात्काळ चारा उपलब्ध झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याच्या इशारा दिला होता. त्याची दखल घेऊन चारा वाटपास प्रारंभ करण्यात आला. त्यानुसार प्रत्येक गावात जाऊन सकाळी ८ ते ९.३० पर्यंत शेतकऱ्याला प्रति किलो एक रुपये प्रमाणे २० किलो चाऱ्याचे वाटप करण्यात येणार आहे. यापुढील काळात चाऱ्याची अडचण आल्यास शेतकऱ्यांनी आपणाला संपर्क साधण्याचे आवाहन राजू पोवार यांनी केले.
राजेंद्र पाश्चापुरे, चुन्नापा पुजारी, आनंदा पाश्चापुरे, वासू पाश्चापुरे, वासू पांढरोळी, सिद्धाप्पा डब्ब, महादेव सनदी, बसवराज कुंभार, रमेश डब्ब यांच्यासह सर्कल, तलाठी, पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.