Friday , September 20 2024
Breaking News

लखनऊचा पंजाब किंग्सवर २१ धावांनी विजय

Spread the love

 

लखनऊ : लखनऊ सुपर जायंट्स संघाने आयपीएल २०२४ मधील आपला पहिला विजय मिळवला आहे. लखनऊचा संघ आपल्या घरच्या मैदानावर विजय नोंदवण्यात यशस्वी ठरला आणि त्यांनी पंजाब किंग्सवर २१ धावांनी विजय मिळवला. लखनऊ संघाचा पदार्पणवीर मयंक यादवच्या भेदक आणि वेगवान गोलंदाजीच्या जोरावर संघाने पंजाब किंग्सकडून विजय हिसकावून घेतला. मयंक यादव आणि नंतर मोहसीन खान हे संघाच्या विजयाचे नायक ठरले.

लखनऊच्या अटलबिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात लखनऊने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत १९९ धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाब किंग्जला चांगल्या सुरुवातीनंतर २० षटकांत ५ गडी गमावून केवळ १७८ धावाच करता आल्या. लखनऊकडून वेगवान गोलंदाज मयंक यादवमुळे लखनऊने सामन्यात शानदार पुनरागमन केले. केएल राहुलऐवजी निकोलस पुरन या सामन्यात संघाचे नेतृत्त्व करत होता. सुरूवातीला शिखर आणि बेयरस्टोची फलंदाजी पाहता सामना हातातून निसटल्याचे दिसले पण मयंकच्या गोलंदाजीने सामन्याचा रोख बदलला.

२०० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्जची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर शिखर धवन आणि जॉनी बेअरस्टो यांनी पहिल्या विकेटसाठी १०२ धावांची मोठी भागीदारी केली. शिखर धवनने ५० चेंडूत ३ षटकार आणि ७ चौकारांच्या जोरावर ७० धावा केल्या. तर बेयरस्टो ३ चौकार आणि ३ षटकार लगावत २९ चेंडूत ४२ धावा करत बाद झाला. प्रभसिमरन सिंगने येताच विस्फोटक फलंदाजीला सुरूवात केली. बाद होण्यापूर्वी त्याने ७ चेंडूत १९ धावा केल्या,ज्यात त्याने २ षटकार आणि एक चौकार लगावला. तर जितेश शर्मा ९ चेंडूत ६ धावा करत बाद झाला. लिव्हिंगस्टोनने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत सामना हातातून निसटला होता. लियामने १७ चेंडूत २ षटकार आणि २ चौकारासह २८ धावांची नाबाद खेळी केली.

मयंकची वेगवान गोलंदाजी

शिखर धवन आणि बेयरस्टोची भागीदारी तोडणं कोणालाच शक्य होत नव्हतं. पण पदार्पणाचा सामना खेळत असलेल्या मयंक यादवने ही भागीदारी तोडली. मयंकने १२व्या षटकातील चौथ्या चेंडूवर जॉनी बेअरस्टोला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मयंक यादवने १४व्या षटकात आणखी एक विकेट मिळवली. त्याने प्रभसिमरन सिंगला नवीन उल हककरवी झेलबाद केले. त्यानंतर पंजाबची धावसंख्या १३९ धावांवर असताना त्यांनी तिसरी विकेट गमावली. मयंक यादवच्या चेंडूवर उपकर्णधार जितेश शर्मा झेलबाद झाला. मयंक यादवने आपला पदार्पण सामना खेळताना शानदार गोलंदाजी करत एलएसजीला सामन्यात परत आणले. मयंकने त्याच्या ३ विकेटसह यंदाच्या आयपीएलमधील १५५.८ किमी प्रति तास वेग असलेला सर्वात वेगवान चेंडू टाकला. सतत भेदक आणि वेगवान गोलंदाजीचा मारा करत त्याने फलंदाजांनी जेरीस आणले.

मयंकनंतर मोहसीन खानचे शानदार १७वे षटक
पंजाब किंग्जला १७व्या षटकात दोन मोठे धक्के बसले. मोहसीन खानने षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर कर्णधार शिखर धवनची विकेट घेतली. त्यानंतर त्याच षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर मोहसीन खानने सॅम करनला निकोलस पुरनकरवी झेलबाद केले. करन गोल्डन डकवर बाद झाला आणि तिथून पंजाबच्या विजयाच्या आशा संपुष्टात आल्या.

तत्पूर्वी, लखनऊने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ गडी गमावून १९९ धावा केल्या. सलामीवीर क्विंटन डी कॉकने अर्धशतक (५४) झळकावले. त्याच्याशिवाय कृणाल पांड्याने ४३ धावांची तर निकोलस पुरनने ४२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली, ज्यामुळे संघाला २०० धावांचा टप्पा गाठता आला. पंजाब किंग्जकडून सॅम करनने ३ विकेट्स मिळवले. त्याच्याशिवाय अर्शदीप सिंगने २ आणि कागिसो रबाडा-राहुल चहरला १-१ विकेट मिळाली.

About Belgaum Varta

Check Also

भारताचा स्टार क्रिकेटपटू शिखर धवनकडून निवृत्ती जाहीर

Spread the love  नवी दिल्ली : टीम इंडियाचा ‘गब्बर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिखर धवनने आंतरराष्ट्रीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *