मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाला उत्सुकता लागलेल्या प्रश्नाचे उत्तर अखेर मिळाले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरील गुढीपाडवा मेळाव्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मनसेचे उमेदवार उभे राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मनसेने लोकसभेसाठी उमेदवार रिंगणात न उतरवण्याची ही सलग तिसरी वेळ आहे. राज ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे निवडणुकीच्या रिंगणाबाहेर राहून दुसऱ्या पक्षाला पाठिंबा दिला आहे.
राज ठाकरे यांनी यावेळी आपली भूमिका मांडताना म्हटले की, सध्याची राजकीय परिस्थिती भीषण आहे. मला या सगळ्या युती-आघाड्यांच्या भानगडीत पडायचे नाही. त्यामुळे राज ठाकरे यांनी बाजूला राहून एखाद्या राजकीय पक्षाला केवळ बाहेरून पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. यावेळी त्यांनी मनसैनिकांसह महाराष्ट्रातील मतदारांनाही सावध करण्याचा प्रयत्न केला. राज ठाकरे यांनी म्हटले की, कृपा करुन या व्यभिचाराला राजमान्यता देऊ नका. महाराष्ट्रात या राजकीय व्यभिचाराला राजमान्यता मिळाली तर पुढचे दिवस भीषण असतील, असा गंभीर इशारा राज ठाकरे यांनी दिला.
नरेंद्र मोदींसारख्या खंबीर नेतृत्वाची देशाला गरज
राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांना बिनशर्त पाठिंबा दिला. यामागील भूमिका सांगताना राज ठाकरे यांनी म्हटले की, मी काही दिवसांपूर्वी माझ्या घरी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मी स्वतंत्रपणे देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा केली. तेव्हा मी फडणवीसांना स्पष्ट सांगितले की, मला ते सगळं नको, मला या सगळ्या वाटाघाटीच्या भानगडीत पाडू नका. मला विधानपरिषद किंवा राज्यसभाही नको. पण या देशाला खंबीर नेतृत्त्वाची गरज आहे. ती गरज पूर्ण झाली नाही तर राज ठाकरेचे तोंड आहेत, हे फडणवीस यांना स्पष्टपणे सांगितले. केवळ देशाला खंबीर नेतृत्त्वाची गरज आहे म्हणून काहीही अपेक्षा न ठेवता महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही आगामी लोकसभा निवडणुकीत फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देत आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
विधानसभा निवडणूक ताकदीने लढवण्याची रणनीती
राज ठाकरे यांनी यावेळी मनसैनिकांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले. आपल्याला यंदाची विधानसभा निवडणूक ताकदीने लढवायची आहे, असा स्पष्ट संदेश राज ठाकरे यांनी दिला. विधानसभा निवडणुकीसाठी आता सहा ते सात महिने शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे आतापासून तयारी सुरुवात केल्यास मनसेला उमेदवारी निवडीपासून ते साधनसामुग्रीची जुळवाजुळव करण्यासाठी पुरेसा अवधी मिळेल.
लोकसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी झालेला उशीर
यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रमुख राजकीय पक्षांनी काही महिन्यांपूर्वीच तयारी सुरु केली होती. त्या तुलनेत मनसेच्या गोटात शांतता होती. राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांचे दौरे वगळता लोकसभा निवडणूक लढवण्याच्यादृष्टीने मनसेच्या स्थानिक नेत्यांनी कोणतीही विशेष तयारी केली नव्हती. किंबहुना राज ठाकरे यांच्याकडून तशा स्पष्ट सूचनाही मनसैनिकांना देण्यात आल्या नव्हता. तसेच भाजपशी युतीची चर्चा करण्यात राज ठाकरे यांचा बराच वेळ गेला होता. अमित शाह यांच्याशी बोलणी फिस्कटल्यानंतर राज ठाकरे यांनी स्वबळावर लोकसभा निवडणूक लढवायचे ठरवले असते तरी उमेदवार निवडीपासून ते बाकीची जुळवाजुळव करण्यासाठी मनसेला फार कमी वेळ मिळाला असता. हा सर्व गोष्टी ध्यानात घेऊन राज ठाकरे यांनी लोकसभेऐवजी विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करण्याला पसंती दिल्याचे दिसत आहे.