जालना : राज्यात पुन्हा एकदा मराठा आंदोलनाचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे. पोलिसांनी उपोषणाला परवानगी नाकारल्यानंतर मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. पोलिसांनी परवानगी नाकारली तरी मी आमरण उपोषणावर ठाम असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. यावेळी जरांगेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
देवेंद्र फडणवीस हे चांगलं काम नाही करायले तुम्ही, शिंदे साहेब तुम्ही सुद्धा नाही. तुम्ही नजरेतून उतरू नका मराठ्यांच्या, दोघांनाही सांगतोय मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊ नका. आंदोलन चिरडण्याच्या मागे लागू नका, या आंदोलनाला पहिल्यापासून परवानगी आहे. स्थगित केलेलं आमरण उपोषण सुरू आहे, तुम्ही विनाकारण डाव रचू नका असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
काही दिवसांपूर्वी अंतरवाली सराटीमधील ग्रामस्थांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला विरोध दर्शवला होता. जरांगे पाटील नव्या ठिकाणी उपोषणाला बसणार होते. जरांगे सगेसोयरे तरतुदीसह अन्य काही मागण्यासाठी ते पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत. परंतु या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यावर जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त करत आक्रमक भूमिक घेतली आहे. आपण उपोषणावर ठाम असल्याचे ते म्हणाले.
मी कायदा मानतो, मी घटना मानतो आणि घटनेने मला अधिकार दिला आहे, परवानगीने अधिकार दिला नाही. चार तारखेला आचारसंहिता होती, मी आचारसंहिता सन्मान केला. पण आता मी तुम्ही नाकारलेल्या परवानगीला मानत नाही. मी कायद्याला मानतो, कायद्याने मला अधिकार दिल्याचं जरांगे पाटील म्हणाले. ओबीसी विरोधात जाणार हे आम्ही ग्राह्य धरलेल आहे. हे आंदोलन स्थगित आहे, स्थगित केलेल्या आंदोलनाला परवानगीची गरज नसल्याचंही ते म्हणाले.