बीड : बीडच्या मस्साजोग गावातले सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण महाराष्ट्रात खूप गाजले. या प्रकरणात राजकीय नेत्यांची नावे जोडल्याने त्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले. दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिन्यांपासून अधिकचा कालावधी झाला तरीही, दोषींवर कारवाई न झाल्याने संताप व्यक्त केला जात होता. या प्रकरणाशी संबंधित खळबळजनक माहिती समोर आली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हा वाल्मीक कराडच आहे असे सीआयडीने म्हटले आहे. या प्रकरणात आरोपपत्र पोलिसांकडून दाखल करण्यात आले आहे. या आरोपपत्रामधून कराड हाच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आहे असे नमूद करण्यात आले आहे. वाल्मीक कराडभोवती कारवाईचा फास पूर्णपणे आवळला गेला आहे.
पोलिसांच्या दोषपत्रानुसार
१. वाल्मीक कराडच संतोष देशमुखांच्या हत्येचा सूत्रधार
२. विष्णू चाटेचा आरोपी नंबर २ असा उल्लेख
३. २९ नोव्हेंबरला सुदर्शन घुलेच्या फोनवरुन कराडने मागितली खंडणी
४. ६ डिसेंबरला संतोष देशमुख यांचा सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि सांगळेशी वाद
५. खंडणी, अॅट्रॉसिटी, हत्येच्या घटनांचा आरोपपत्रात एकत्रित उल्लेख
५. गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानंतर कराडविरुद्ध सबळ पुरावे मिळाले असल्याची माहिती समरो आली आहे. त्याशिवाय सुदर्शन घुले हा संतोष देशमुख याना मारहाण करतानाचा व्हिडीओही सीआयडीजवळ आहे. वाल्मीक कराडने आवादा कंपनीला खंडणी मागितली. त्यातून झालेल्या वादानंतर हत्या झाल्याचेही समोर आले आहे. आवादा पवनचक्की प्रकल्पाचा प्रोजेक्ट मॅनेजर सुनील केंदू शिदे यांना दोन कोटी रुपयांची खंडणी वाल्मीक कराडने विष्णू चाटेचा फोन वापरुन मागितली होती.
दरम्यान वाल्मीक कराडवर आरोप करण्यात आले होते. त्यानंतर तो फरार झाला. पुढे वाल्मीक कराडने सीआयडीसमोर शरणागती पत्करली. खंडणी प्रकरणावरुन त्याला ताब्यात घेण्यात आले. दरम्यान पोलिसांनी अन्य आरोपींनाही ताब्यात घेतले होते. आरोपपत्रानंतर आता लवकरच कारवाईला सुरुवात होईल असे लोक म्हणत आहेत.