मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ निर्माण झाली. देवेंद्र फडणवीस यांनी लगेचच देवगिरी बंगला गाठला आणि अजित पवार, सुनील तटकरे यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी धनंजय मुंडे देखील उपस्थित होते. शेवटी आता धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिला आहे. धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. गेल्या काही दिवसांपासून सतत धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव होता.
काल रात्रीच्या बैठकीत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा निर्णय झाला होता. शेवटी त्यांनी सकाळी राजीनामा दिला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री यांनी मुंडेंचा राजीनामा स्वीकारला आणि पुढील कारवाईसाठी राज्यपालांकडे पाठवला. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडून सुरूवातीपासूनच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. अजित पवार यांनी म्हटले होते की, राजीनामा द्यायचा की नाही हा निर्णय धनंजय मुंडे हेच ठरवतील.