
नागपूर : नागपूरच्या महल परिसरात दोन गटातील वादानंतर दगडफेकीची घटना घडली. दोन गटात दगडफेक झाल्यानंतर वाहनांची जाळपोळ झाली. या घटना घडल्यानंतर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या महल परिसरात दोन गटात मोठा राडा झाला. दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. काहींनी वाहनांची जाळपोळ देखील केली. दोन्ही गटात दगडफेक झाल्यानंतर परिसरात तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन गटाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. या दगडफेकीत पोलीस देखील जखमी झाले आहेत.
वाहनांची जाळपोळ
दोन गटात वाद झाल्यानंतर काहींनी वाहनांची जाळपोळ केली. महल परिसरातील दोन वाहने जाळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. जेसीबी आणि एक लहान वाहन अशी दोन वाहने जाळण्यात आली आहे. दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेनंतर परिसरात तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. घटनास्थळावरील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. या घटनेत पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.
शांततेचं आवाहन
नागपुरातील घटनेनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागरिकांना शांततेचं आवाहन केलं आहे. ‘नागपुरातील महाल भागात तरुणांच्या दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर तणावपूर्ण स्थिती निर्माण होणे दुर्देवी आहे. नागपूरकरांनी शांतता बाळगून प्रशासनाला परिस्थिती हाताळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन नागपूरचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरकरांना शांततेचं आवाहन केलं आहे.
Belgaum Varta Belgaum Varta