बेळगाव : जिद्द चिकाटी आणि परिश्रम करायची तयारी असेल तर तुम्हीं आयुष्यात नक्की यशस्वी व्हाल. त्यासाठी एकाग्रतेने अभ्यास करून आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा, असे विचार, रोटरी क्लब ऑफ वेणूग्रमाचे माजी अध्यक्ष डी. बी. पाटील यांनी व्यक्त केले.
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित मणगुत्ती येथील लाल बहादूर शास्त्री विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आणि वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
विद्यालयाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी, शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष झुंझारराव पाटील हे होते.
सुरुवातीला मुख्याध्यापक डी के स्वामी यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून सांगितला व उपस्थितांचे स्वागत केले. सहाय्यक शिक्षक शिवाजी हसनेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर विद्यार्थी प्रतिनिधी आनंद पाटील यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
प्रारंभी प्रमुख पाहुणे डी. बी. पाटील यांच्याहस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. तर झुंझारराव पाटील यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तर माजी ग्राम पंचायत सदस्य महादेव पाटील यांनी पुष्पहार घालून सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. श्री लक्ष्मीदेवी सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक महेश पाटील यांच्या व पाहुण्यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. सौ. गीता बेडका यांनी वार्षिक अहवाल सादर केला.
याप्रसंगी आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांची निरोप देणारी भाषणे झाली तर दहावीच्या विद्यार्थ्यांची निरोप घेणारी भाषणे झाली. यावेळी सहाय्यक शिक्षक शिवाजी हसनेकर व वर्गशिक्षक आर ए कामनगोळ यांची सदिछापर भाषणे झाली तर झुंझारराव पाटील यांचे अध्यक्षीय भाषण झाले.
याप्रसंगी महेश पाटील, राजू पाटील, आर. बी. शामने व बाळू मगदूम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
एस. के. मेंडूले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर के. एम. राऊत यांनी आभार मानले .