
पुणे : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील बेळगाव-निपाणी-कारवार या मराठी भाषिक गावांचा समावेश महाराष्ट्रात व्हायलाच हवा, अशी भूमिका उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मांडली आहे. आज महाराष्ट्र दिनी पुण्यात आयोजित शासकीय कार्यक्रमात ते बोलत होते.
पुणे पोलिसांच्या शिवाजीनगर येथील मुख्यालयात ध्वजवंदन कार्यक्रमानंतर बोलताना पवार म्हणाले, “सीमेवरील बेळगाव-निपाणी-कारवार ही मराठी भाषक गावं अद्यापही महाराष्ट्रात समाविष्ट होऊ शकली नसल्यानं आजही आपल्याला खेद वाटतो. मी तुम्हाला खात्री देतो की, या गावातील लोकांच्या महाराष्ट्रात सामिल होण्याच्या लढ्याला आमचा कायमच पाठिंबा राहिल”
दरम्यान, यावेळी अजित पवार यांनी राज्यातील जनतेला स्वतःहून मास्क वापरण्याचं आवाहन केलं. कोविड अद्याप पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळं मास्कसक्ती नसली तरी जनतेनं मास्क वापरलं पाहिजे असं ते म्हणाले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सकाळी मराठी ट्विट करत महाराष्ट्रातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
पूर्वीच्या मुंबई प्रांताचं भाषिक तत्वावर गुजरात आणि महाराष्ट्र अशा दोन राज्यांमध्ये विभाजन झालं. त्यानंतर अनेक आंदोलनं आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर संसदेनं केलेला मुंबई पुनर्रचना कायदा १ मे १९६० रोजी लागू झाला आणि स्वतंत्र महाराष्ट्र मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यामुळं १ मे हा ‘महाराष्ट्र दिन’ साजरा केला जातो.
Belgaum Varta Belgaum Varta