मुंबई : काही दिवसांपूर्वी मीरा भाईंदरच्या व्यापाऱ्यांनी मोर्चा काढत भाषासक्ती खपवून घेतली जाणार नाही, अशी भूमिका घेतली होती. आता याच मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून मीरा भाईंदरमध्ये मराठी भाषेसाठी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या निमित्ताने ठाकरे गट आणि मनसे पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळाले आहेत.
मनसे, शिंदे गटाचे नेते मोर्चात एकत्र
या मोर्चामध्ये मनसे आणि ठाकरे गटाचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठाकरे गटाचे आमदार राजन विचारे यांनीही या मोर्चात हजेरी लावली. तसेच मनसेचे नेते संदीप देशपांडे, मनेसेचे नेते तथा माजी आमदार नितीन सरदेसाई यांनीही या मोर्चात हजेरी लावून महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी आलीच पाहिजे, अशी भूमिका घेतली.
अमराठी व्यापार्यांनी काढला होता मोर्चा
काही दिवसांपूर्वी मनसेच्या एका कार्यकर्त्याने मीरा भाईंदरमध्ये एका अमराठी व्यापाऱ्याला मराठीमध्ये बोल म्हणत मारहाण केली होती. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर मात्र मारहाणीचे हे प्रकरण चांगलेच गाजले होते. याच मारहाणीविरोधात मीरा भाईंदरमधील अमराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता. तसेच अशा प्रकारची गुंडगिरी थांबवावी, मारहाण करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली होती.
रेल्वे स्थानकाजवळ जमले मराठी लोक, नेत्यांची भाषणे
याच मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून आज (7 जुलै) मराठी भाषिकांचा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र हा आदेश झुगारून मीरा भाईंदरच्या रस्त्यांवर मराठी भाषिक एकत्र जमले होते. मीरारोडवरील रेल्वे स्थानकावर मराठी लोक जमले होते. यावेळी एका ट्रकवर उभे राहून मनसे, ठाकरे गट, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी जमलेल्या आंदोलकांना संबोधित केले.
यावेळी महाराष्ट्रात राहून मराठी शिकावी लागेल. मुजोरी केली तर कानाखाली खावीच लागेल, असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला. तर राजन विचारे यांनी शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईक यांच्यावर टीका केली. प्रताप सरनाईक यांना या मोर्चात सहभागी होण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. त्यांनी अगोदर आपल्या मंत्रिपदाचा, आमदारकीचा राजीनामा द्यावा, त्यानंतरच त्यांनी या मोर्चात सहभागी व्हावे, असा हल्लाबोल राजन विचारे यांनी केला.
Belgaum Varta Belgaum Varta