“स्त्री” हो तुम!! “संघर्ष” भी करो, और श्रृंगार भी!
तुम दोनो रूप मे निखर के सामने आओगी!!
“ऊन, वारा, पाऊस याची तमा न करता संसाराचा गाडा हाकताना संघर्ष करत “पार्सल वितरण सेवा” अर्थात “डिलिव्हरी असोसिएट” म्हणून सेवा बजाविणाऱ्या “मोहिनी राजू रावळोजी” यांचे रूप बेळगावात निखरून आले आहे.
बेळगाव शहरात पहिली महिला असोसिएट म्हणून काम करणाऱ्या मोहिनी रावळोजी या एकमेव आहेत. 2017-18 साली त्यांनी पार्सल सेवेत पदार्पण केले आणि आजही त्या तितक्याच उमेदींनी या कार्यात कार्यरत आहेत.
मोहिनी यांचा दिवस पहाटे 5 वाजता सुरू होतो. सर्व स्वयंपाक, डबा आटोपून सकाळी 8 वाजता “त्या” पार्सल कलेक्ट करण्यासाठी कणबर्गी येथे जातात. तेथून 50 ते 60 पार्सल कलेक्ट करून रूटला जातात. कपिलेश्वर कॉलनी ते मारुती गल्ली असा 30 ते 40 गल्ल्यांचा रूट “त्या” रोज करतात. पहिला मुलगा आरव चार ते पाच वर्षाचा असताना या सेवेतला त्यांनी सुरुवात केली. मुलगा अकरा वर्षाचा आहे तर मुलगी तीन वर्षाची आहे. दुसऱ्या डिलिव्हरी नंतर मुलगी आठ ते नऊ महिन्याची असताना पुन्हा त्याच जोमाने पार्सल वितरण सेवेत उतरल्या. मुलीला “बेबी बॅग” लावून पार्सल वितरण केले. मुलगी आर्या हिला आजही “त्या” सोबत घेऊनच सेवा बजावतात. मुलीला सकाळी आठ वाजता शाळेसाठी तयार करूनच त्या आपल्या कामावर निघतात. दुपारी एक वाजता शाळेत सोडतात. मुलांची तब्येत व मूड आपल्या हातात नाही मात्र त्यातूनही मुलगा व मुलगी समजूतदार आहे. परिस्थिती आणि वेळ मुलांना समजूतदार घडविते. मात्र आई म्हणून रोजची भ्रमंती करताना चित्त पिलांपाशी असल्याचे “त्या” आवर्जून सांगतात.
या सेवेत पतींची साथ कशी लाभली याविषयी बोलताना त्या म्हणतात की, संसार चालविताना पती-पत्नी दोन्ही तितकेच समान पातळीवर कार्यरत असणे गरजेचे आहे. पती राजू रावळोजी खासगी बँकेत कर्मचारी आहेत. त्यामुळे शनिवार, रविवारआणि सरकारी सुट्ट्या असताना आवर्जून मुलांची व घरची जबाबदारी घेतात. दररोजच्या कामात देखील तितकीच त्यांची भागीदारी असते. सासू-सासरे नसल्याने एकमेकांच्या साथीनेच वाटचाल करत असल्याचे त्यांनी सांगितले.
मोहिनी यांचे माहेर कोल्हापूर तर सासर बेळगाव (आंबेवाडी) आत्या व आजींनी त्यांचा सांभाळ केला. त्यांचे शिक्षण अवघे दहावी. मात्र कोल्हापूरचा मराठी बाणा दाखवत कन्नडचा गंध व इंग्रजीवर प्रभुत्व नसताना देखील पार्सल वितरण सेवेत आहेत. कोणाच्या बंधनात न राहता आपल्या मर्जीनुसार सोयीने आणि विशेषता फिरतीचे काम असल्याने कुटुंबाला वेळ देणे शक्य होतेच. म्हणून त्यांनी सात ते आठ तास ऑफिस काम करण्यापेक्षा हे काम निवडले. परिस्थितीनुसार माणूस आपोआप घडतो. कोणाचाच पाठिंबा नसल्याने परिस्थितीने, वेळेने सर्व काही शिकविले असल्याचे “त्या” म्हणतात.
संदेश
जागतिक महिला दिनी महिलांसाठी संदेश देताना त्या म्हणाल्या की, प्रत्येक स्त्रीने स्वतः कणखर राहिलेच पाहिजे. वेळ सांगून येत नाही वेळेला संधी बनविण्याचे काम “स्त्री”च्या हातात आहे. “मी कमी आहे यापेक्षा मी करू शकते” हा आत्मविश्वास गरजेचा आहे.
अनुभवातून शिकणे गरजेचे
पार्सल वितरण करताना भाषेची समस्या येते. कन्नड येत नसल्याने अनेक कस्टमर बडबड करतात. त्यांचे सामान वेळेत नाही पोचले तर टेन्शन असतेच शिवाय किंमती वस्तू डॅमेज न होता पोचवणे देखील कसरतीचे असते. मात्र आता अनुभवातून पारंगत झाल्याचे “त्या” सांगतात. अवघ्या चार ते पाच तासात रूट करून पुढील कामे करते, असे त्या म्हणतात.
पार्सल वितरण सेवेत महिलांची एन्ट्री
पूर्वी केवळ मी एकटीच महिला म्हणून या कामात कार्यरत होते. मात्र आत्ता ॲमेझॉन बरोबरच मिशो, फ्लिपकार्ट मध्ये देखील मुली कार्यरत आहेत. शारीरिक, मानसिक दृष्ट्या त्रासाचे काम नसून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविते. यामुळे कोणते काय छोटे व मोठे न मानता संसार चालविण्यासाठी, शिक्षणासाठी महिला वर्गाने याकडे वळले पाहिजे.
सकारात्मक दृष्टिकोन महत्वाचा
परिस्थितीने खचून न जाता सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वाटचाल केल्यास यश मिळते. आता रूटवर जाताना अनकेजन थांबून विचारतात “तुम्ही कसे काय काम करता” बऱ्याच वेळा चकित होतात. आणि आपल्या लेकी, सुनांना उदाहरण देतात यावेळी नक्कीच प्रोत्साहन मिळते व आपण सकारात्मक दृष्टिकोनाचे उदाहरण असल्याचा अभिमान वाटतो, असे त्या सांगतात. कुटुंब स्वतःचे आरोग्य आणि दररोजची भ्रमंती यांचा समतोल साधत रोजचा सुरू असणारा हा प्रवास थक करणारा.
“कोमलतेची जणू ती साक्षात मूर्ति
धैर्यतीच्या श्वासात दडलं आहे,
मर्यादित नाही तिचं अस्तित्व
याचं भान तिला आहे” असंच म्हणावं लागेल.
महिला दिनी त्यांच्या कर्तृत्वाला सलाम व पुढील वाटचालीस शुभेच्छा..
Belgaum Varta Belgaum Varta