कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी सर्व समाजाला सोबत घेतलं पाहिजे. महाराष्ट्राने एकमुखाने पुढे गेले पाहिजे. त्यासाठी कोल्हापुरात मूक आंदोलन झालं. हा आवाज निश्चित मुंबईपर्यंत जाईल. मराठा समाजाचा आवाज दिल्लीपर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी राज्यातील ४८ खासदारांसह राज्य सरकारने हा विषय दिल्लीपर्यंत पोहोचवायला हवा, अशी अपेक्षा शाहू छत्रपती महाराज यांनी कोल्हापुरात व्यक्त केली. मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळासमोर झालेल्या मूक आंदोलनावेळी ते बोलत होते.
अलीकडच्या काळात मी पहात होतो. जनतेतं नाराजी निर्माण होत चालली आहे. एकमेकांच्या विरोधात बोलण्याचं, समाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. पण आता सर्व समाजाला सोबत घेतलं पाहिजे. महाराष्ट्राने एकमुखाने पुढे गेले पाहिजे. त्यासाठी हे मूक आंदोलन झालं, असे शाहू छत्रपती महाराज म्हणाले.
मराठा आरक्षणासाठी आता एकच पर्याय आहे. केंद्र शासनाने हा विषय मनावर घेतला तरच हा प्रश्न सुटू शकतो. त्यासाठी कार्यवाही केली पाहिजे. दोन तृतीयांश खासदारांनी पाठिंबा देऊन नवीन कायदा आणला पाहिजे. महाराष्ट्र शासन हे आपल्याबरोबर आहे त्यात काही शंका नाही. राज्याने पुनर्विचार याचिका दाखल करायला हवी, असेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधानांपर्यंत हा विषय नेता आला पाहिजे. मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधानांचे विचार काय आहेत हे स्पष्ट झालेले नाही, असेही त्यांनी नमूद केले.
मराठा समाज सक्षम समाजला जातो. मराठा समाज कमजोर आहे असे समजू नका. आपण बलाढ्य आहोत असे समजा. तुम्ही सक्षम रहा. शिक्षण, शेती इथे मागू पडून राहणार नाही, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे डॉ. प्रकाश आंबेडकर, खासदार संजय मंडलिक, धैयशील माने, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, ऋतुराज पाटील, आमदार राजेश पाटील, विनय कोरे, राजू आवळे, प्रकाश आबिटकर आणि शाहू छत्रपती महाराज सहभागी झाले होते.