युवा कार्यकर्त्यांची आर्त हाक
खानापूर : तालुक्यात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व युवा कार्यकर्त्यांनी सध्या सुरू असलेल्या गटबाजीचे राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन सीमाप्रश्न सोडवण्यासाठी तसेच मराठी भाषा टिकवण्यासाठी प्रयत्न करणे काळाची गरज आहे.
सध्या खानापूर तालुक्यात माजी आमदार दिगंबर पाटील गट, माजी आमदार अरविंद पाटील गट त्यात युवा समिती गट तयार झाला आहे. यावरून तालुक्यात पुढे पुढे गटातटाचे राजकरण वाढत जाणार हे कुठे तरी थांबले पाहिजेत, अशी खानापूर तालुक्यातील मराठी जनतेची मागणी आहे. माजी आमदार दिगंबरराव पाटील यांच्या गटातील कांही मंडळी राष्ट्रीय पक्षातील नेत्यांशी संगनमत करून अर्थकारण करत आहेत आणि माजी आमदार अरविंद पाटील खुद्द भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा तालुक्यातील जनता व्यक्त करत आहेत. दुसरीकडे युवा समितीच्या माध्यमातून युवा समिती सक्रिय असताना त्यांना शह देण्यासाठी दुसरी युवा आघाडी तयार करून पुन्हा ‘खो’ घालून खानापूर युवा समिती बोथट करण्याचा विडा कांही ज्येष्ठ समिती नेत्यांनी घेतला आहे. अशा घाणेरड्या राजकारणामुळे समितीमधील युवा पिढीचे भवितव्य अंधारात दिसत आहे. अशाने युवा पिढी राष्ट्रीय पक्षाकडे वळत आहे. त्यामुळे समितीच्या दोन्ही गटाने एकत्रित येऊन पडलेली फूट थांबवावी.
ही फूट दुर करण्यासाठी सोमवारी होणाऱ्या सत्कार सोहळ्याला दोन्ही गटाच्या प्रतिनिधीनी, पदाधिकाऱ्यांनी तसेच युवा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची हीच वेळ आहे. जर पुन्हा हेवेदावे मनात ठेवून जर अनुपस्थिती दर्शविली तर गटातटाचे राजकरण वाढत जाऊन तालुक्याला पुन्हा लोकप्रतिनिधी मिळणार नाही. तेव्हा बेळगाव युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके व समिती नेते मदन बामणे यांच्या सत्कार कार्यक्रमातून तरी दोन्ही गट एकत्र येतील अशी आशा आहे.