बंगळुरू : राज्यात पावसाचे प्रमाण वाढत असून किनारपट्टी व डोंगराळ भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. किनारपट्टीसह काही जिल्ह्यांमध्ये आणखी पाऊस पडणार असून रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
कर्नाटकात गेल्या १५ दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर तीन राज्यांमध्ये रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
कर्नाटकातील उत्तर कन्नड, उडुपी आणि दक्षिण कन्नड या किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल. शिमोगा आणि चिक्कमंगळूर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडणार असून रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
कोडगू, हसन, चित्रदुर्ग, दावणगेरे, धारवाड, गदग, कलबुर्गी, बिदर, बेळगाव, रायचूर, यादगिरी जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडेल. बंगळुरू शहर, बंगळुरू ग्रामीण, मंड्या, म्हैसूर जिल्ह्यातही पाऊस पडेल.