काठमांडू : नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये मोठी दुर्घटना घडली. उड्डाण घेत असताना विमानाला आग लागून भीषण अपघात झाला. उंचावरून हे विमान थेट खाली कोसळले. या दुर्घटनेत १८ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्ती केली जात आहे. सध्या मदतकार्यासाठी बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. अपघातानंतर संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. या विमान दुर्घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये टेकऑफ दरम्यान हे विमान कोसळले. अपघातग्रस्त विमान काठमांडू येथून पोखराला जात होते. या विमानातून एकूण १९ प्रवासी प्रवास करीत होते. काठमांडू पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सूर्या एअरलाइन्सचे विमान काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उड्डाण करत असताना अपघातग्रस्त झाले.
सकाळी ११ वाजेच्या सुमारास विमानाने काठमांडू धावपट्टीवरून उड्डाण भरले. मात्र, काही क्षणातच विमानाला भीषण आग लागली. बघता-बघता विमान धावपट्टीवरच कोसळले. या दुर्घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. विमान अपघाताची माहिती मिळताच प्रशासकीय अधिकाऱ्यांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
विमानाला आग लागल्याने परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून सध्या आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे. विमानातील सर्वच १९ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta