जबलपूर : मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये बुधवारी सायंकाळी भीषण अपघाताची घटना घडली आहे. एक भरधाव ट्रक रिक्षावर उलटल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात ३ महिलांसहित ७ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताच्या घटनेने मृत व्यक्तींच्या गावावर शोककळा पसरली आहे.
मध्य प्रदेशच्या जबलपूर मझगवा पोलीस स्टेशन हद्दीत ही भीषण अपघाताची घटना घडली आहे. प्रवाशांनी भरलेली रिक्षा जबलपूरला निघाली होती. त्याचवेळी रस्त्यात ट्रक आणि रिक्षाची धडक झाली. यानंतर भरधाव ट्रक हा प्रवाशांनी भरलेल्या रिक्षावर उलटला. त्यानंतर झालेल्या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच गोंधळ उडाला. या घटनेत मृतांच्या नातेवाईकांचा अश्रूंचा बांध फुटला.
या अपघातानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या अपघातातील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातातील मृतांमध्ये चार पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. तर या अपघातात १० जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये ६ पुरुष आणि ४ महिलांचा समावेश आहे.
भीषण अपघातात मृत्यूमुखी असलेले लोक प्रतापपूरमध्ये राहणारे होते. या अपघातानंतर गावकऱ्यांनी रास्ता रोको केला. गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या भीषण अपघातात मृत्यूमुखी पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दोन-दोन लाख रुपये मदत जाहीर केली आहे.
रस्ता दुर्घटना निधीतून १५-१५ हजार रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे. आमदार निधीतून ५-५ हजार रुपयांची तातडीने मदत जाहीर करण्यात आली आहे. या संबल योजनेतून या मृतांच्या नातेवाईकांना ४-४ लाख रुपये वेगळे दिले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta