बेळगाव : लाखो भाविकांना उत्साह देणार्या यंदाच्या सार्वजनिक गणपतींची विसर्जन मिरवणूक तब्बल २८ तास चालली. गेल्या ११ दिवसांपासून सुरु असलेल्या गणेशोत्सवाची जल्लोषात सांगता करण्यात आली.
मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळ बेळगाव आणि श्री लोकमान्य टिळक गणेश महामंडळ बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शुभारंभाच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महापौर सविता कांबळे, दक्षिण आमदार अभय पाटील, उत्तरचे आमदार असिफ (राजू) सेठ, उपमहापौर आनंद चव्हाण, माजी आमदार ॲड. अनिल बेनके, भाजप नेते महांतेश कवटगीमठ, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मारबानियांग, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
हुतात्मा चौकातून मंगळवारी सायंकाळी ४ वाजता श्री गणेश विसर्जन मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला होता. मात्र २४ तास उलटूनही विसर्जन मिरवणुकीची सांगता झाली नाही. मिरवणुकीच्या सुरुवातीपासून अखेरपर्यंत तरुण -तरुणी – आबालवृद्धांच्या उत्साहात किंचितही कमतरता दिसली नाही. हजारो गणेशभक्तांच्या उपस्थितीत विसर्जन मिरवणूक उत्साहात पार पडली. शहापूर, कपिलेश्वर तलाव, जक्केरी हुंड, अनगोळ तलाव, किल्ला तलाव यासारख्या अनेक ठिकाणी घरगुती आणि सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या गजरात गणरायाला निरोप देण्यात आला. मिरवणूक मार्गावर तरुण तरुणींसह आबालवृद्धांनी रात्रभर जागून उपस्थिती दर्शविली.
विविध गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींसमोर पारंपरिक वेशभूषेतील गणेशभक्तांचा सहभाग, कलापथके, झांज, लेझीम, ढोल – ताशा पथकांचा सहभाग होता. विसर्जन मिरवणुकीदरम्यान जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यासपीठावर बसून मिरवणूक पाहिली. तसेच गणेशोत्सव मंडळांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. बेळगाव महानगरपालिका व्याप्तीसह उपनगरातील विविध गणेशमूर्तींनीही विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला होता. तब्ब्ल ३९० गणेशमूर्तींचा सहभाग, हजारो गणेशभक्त, कलापथकांचे सादरीकरण यामुळे संपूर्ण मिरवणूक लक्षवेधी ठरली. बहुतांश गणेशोत्सव मंडळांनी १२ फुटापेक्षा अधिक मूर्ती साकारल्या होत्या. या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी पालिका प्रशासनाच्या वतीने क्रेनची व्यवस्था करण्यात आली होती. शहरातील काही तुरळक घटना वगळता संपूर्ण मिरवणूक शांततेत आणि सुरळीत पार पडली. मात्र यंदाही डॉल्बीमुक्त विसर्जन मिरवणुकीला फाटा देत अनेक गणेशोत्सव मंडळांनी डॉल्बी आणि लेझर लाईटचा वापर केल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शिवाय यंदाही गणेश विसर्जन मिरवणूक नियोजनाअभावी लांबल्यानेही नाराजी व्यक्त होत आहे.