नवी दिल्ली : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि त्यांची पत्नी कल्पना सोरेन यांच्या नेतृत्वात इंडिया आघाडीने पुन्हा झारखंडमध्ये सत्ता मिळवली आहे. झारखंड सारख्या आदिवासी राज्यात झारखंड मुक्ती मोर्चाने दुसऱ्यांना ऐतिहासिक पुनरागमन केलं आहे. या निवडणुकीत विरोधकांकडून सोरेन पती-पत्नीवर बंट-बबली म्हणून टीका करण्यात आली. मात्र, विरोधकांच्या टीकेला त्यांनी विजयातून प्रत्युत्तर दिलं आहे. झारखंड मुक्ती मोर्चाच्या युतीने ५६ जागांवर विजय मिळवला आहे. तर भाजपला फक्त २२ जागा जिंकता आल्या आहेत.
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची पत्नी आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे उमेदवार कल्पना सोरेन यांनी गांडेय विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार मुनिया देवी यांचा १७,१४२ मतांनी पराभव केला. या आधी कल्पना सोरेन यांनी ४ जून रोजी याच मतदारसंघातील पोटनिवडणुकीत विजय मिळवला होता.
झारखंड मुक्ती मोर्चाचे आमदार सरफराज अहमद यांच्या राजीनाम्यानंतर ही जागा रिकामी झाली होती. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत कल्पना यांनी भाजपच्या दिलीप कुमार वर्मा यांचा २७,१४९ मतांनी पराभव केला होता.
झारखंडमध्ये राष्ट्रीय जनता दलाची चांगली कामगिरी
झारखंड विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव म्हणाले की, ‘झारखंड विधानसभा निवडणुकीत ४ उमेदवार जिंकून आले आहेत. तर १ ते २ जागेवर फार कमी मतांनी उमेदवारांचा पराभव झाला आहे. झारखंडमध्ये प्रचंड बहुमताच्या जोरावर हेमंत सोरेन मुख्यमंत्री होणार आहेत. झारखंडनंतर आता बिहारची वेळ आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत आम्ही बिहारमध्ये एनडीए युतीचं सरकार स्थापन करून देणार नाही’.
दरम्यान, मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे ४९ वर्षांचे आहेत. त्यांचा राजकीय कारकिर्दीत चढ-उतार आले. सध्या त्यांना पक्षातील अंतर्गत वादाचा फटका सहन करावा लागत आहे. त्यांचा जन्म १० ऑगस्ट १९७५ रोजी हजारीबाग येथील नेमरा गावात झाला. झारखंड मुक्ती मोर्चाचे सहसंस्थापक शिबू सोरेन यांच्या राजकीय विचाराचा पगडा हेमंत यांच्यावर होता.
Belgaum Varta Belgaum Varta