मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज (दि.12) 85 वा वाढदिवस आहे. दरम्यान, वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शरद पवारांची भेट घेतली होती. अजित पवार यांनी भेट घेतल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील शरद पवारांची भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार आहेत.
अमित शाह शरद पवारांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार
सध्या अमित शाह आणि शरद पवार दोघेही संसदेत आहेत. संसदेतच अमित शाह शरद पवारांची भेट घेणार आहेत. या भेटीमध्ये शरद पवारांना अमित शाहांच्या वतीने शुभेच्छा दिल्या जाणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, अजित पवार यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर अनेक राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत. आज सकाळीच अमित शाहांनी शरद पवारांना फोन करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे.