हैदराबाद : तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुनला आज पोलिसांनी अटक केली. त्यानंतर वैद्यकीय तपासणीनंतर त्याला आज नामपल्ली कोर्टात हजर करण्यात आलं. तिथे त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र अभिनेत्याने जामिनासाठी तेलंगणा हायकोर्टात धाव घेतली आहे.
४ डिसेंबरला ‘पुष्पा २’ चित्रपटाचा प्रिमियर इव्हेंट होता. याठिकाणी झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेमध्ये एका ३९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. या महिलेचा मुलगा रुग्णालयात असून त्याची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी पोलिसांनी अभिनेता अल्लू अर्जुन, संध्या थिएटर व्यवस्थापन आणि अल्लू अर्जुनच्या सुरक्षा पथकाविरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी अल्लू अर्जुनला शुक्रवारी दुपारी अटक करून रुग्णालयात नेलं. नंतर त्याला नामपल्ली कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर अल्लू अर्जुनने तेलंगणा हायकोर्टात धाव घेतली आहे.