क्षयरोगमुक्त भारत या केंद्र सरकारच्या मोहिमेची संजीवीनी फौंडेशन येथून सुरुवात
बेळगाव : क्षयरोग निर्मूलनासाठी भारत सरकारने १०० दिवसांची “क्षयरोग मुक्त भारत’ ही मोहीम सुरू केली असून प्रत्येक भारतीयांने यात सहभागी होऊन ही मोहीम यशस्वी करून “क्षयरोगमुक्त भारत” निर्माण करूया असे उदगार संजीवीनी फौंडेशनचे सीईओ मदन बामणे यांनी काढले.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत, प्राथमिक आरोग्यकेंद्र वडगाव आणि संजीवीनी फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या मोहिमेचे उदघाटन करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
आदर्शनगर येथील संजीवीनी फौंडेशनच्या सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी व्यासपीठावर प्राथमिक आरोग्य केंद्र वडगावच्या वरिष्ठ एलएचव्ही महादेवी शिवमूर्तीमठ, वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ पर्यवेक्षक नवीन कोटगी, पर्यवेक्षक प्रवीण बेटगार उपस्थित होते.
सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन करण्यात आले. तसेच संजीवीनी फौंडेशनच्या वतीने श्रीमती शिवमूर्तीमठ यांचा विशेष भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर मदन बामणे आणि शिवमूर्तीमठ यांच्याहस्ते रोपट्याला पाणी घालून मोहिमेचे उदघाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महादेवी शिवमूर्तीमठ यांनी पुढील शंभर दिवसात शाळा, महाविद्यालय, अनाथाश्रम, वृद्धाश्रम तसेच जिथे जिथे सामूहिकपणे नागरिक जमतील तिथे तिथे प्रत्येकाची तपासणी करणार असल्याचे सांगितले. ज्यांना ज्यांना क्षयरोगाचे निदान होईल त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करून औषधोपचार केला जाईल आणि २०२५ पर्यंत या रोगाचा समूळ नाश होण्यासाठी आमचे प्राथमिक आरोग्य केंद्र झटेल अशी ग्वाही दिली.
यावेळी “क्षयरोगमुक्त भारत” या मोहिम प्रत्येकाला समजण्यासाठी तयार करण्यात आलेल्या भीतीपत्रकाचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. शेवटी उपस्थित आज्जीआजोबांची क्षयरोग तपासणी करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी कल्पना शेट्येपन्नावर, नागम्मा रैनापूर, संजीवीनी फौंडेशनच्या समुपदेशक सरिता सिद्दी व आशा कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य पर्यवेक्षक प्रविण बेटगार यांनी सूत्रसंचालन केले तर संजीवीनी फौंडेशनच्या एचआर प्रमुख कावेरी लमानी यांनी आभार मानले.