नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले आहे. येत्या 5 फेब्रुवारीला मतदान होणार असून या मतदानची मतमोजणी 8 फेब्रुवारीला होणार आहे आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेत या संदर्भातली माहिती दिली आहे.
देशाच्या अनेक राज्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये अनेक रेकॉर्ड तयार झाले. अनेक नवतरुणांनी लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभाग नोंदवला. आगामी काळात देखील लोकशाही मजबूत करण्यासाठी ही टक्केवारी अधिक वाढत जाईल. किंबहुना प्रत्येक निवडणुकीनंतर ईव्हीएमवर आरोप होतच राहतात. कुठल्याही यंत्रणेनं ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही. यंत्रणात चूक असेल, वैयक्तिक चूक असेल तर दाखवा, तत्काळ कारवाई करू. असेही केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटले आहे.
ईव्हीएम संदर्भातील आरोपांवर बोलतांना राजीव कुमार म्हणाले की, ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही, असे कोर्टानेही म्हटले आहे. त्यामुळे वायरस किंवा इतर यंत्रणांनी ईव्हीएम हॅक होऊ शकतो हा दावा पूर्णतः खोटा असल्याचे सांगत राजीव कुमार यांनी राज्यातील निवडणुकांवरील आरोपांवर उत्तर दिले आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदमध्ये ते बोलत होते.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे
* विधानसभा निवडणुकीची 10 जानेवारी अधिसूचना.
* उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी.
* उमेदवारी अर्ज छाननी करण्याची तारीख 18 जानेवारी.
* उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी * मतदानाची तारीख 5 फेब्रुवारी. * निकालाची तारीख 8 फेब्रुवारी.