
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीत सत्ताधारी आम आदमी पक्ष, काँग्रेस, भाजपासह सर्व पक्षांचा जोरदार प्रचार सुरु आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (२७ जानेवारी) आम आदमी पार्टीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी १५ गॅरंटी जाहीर केल्या आहेत. यामध्ये रोजगार, आरोग्य सेवा, शिष्यवृत्ती, मोफत वीज, २४ तास पाणी, विद्यार्थ्यांना मोफत बस, रेशन कार्ड, मुलीच्या लग्नासाठी १ लाख रुपयांची मदत अशा विविध १५ मोठ्या घोषणा केल्या आहेत.
अरविंद केजरीवाल यांच्या १५ गॅरंटी कोणत्या?
महिला सन्मान योजना : महिला सन्मान योजनेच्या माध्यमातून प्रत्येक लाभार्थी महिलेला बँक खात्यात २१०० रुपये देण्यात येतील.
संजीवनी योजना : संजीवनी योजनेच्या माध्यमातून ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांसाठी मोफत उपचार मिळतील. दिल्ली सरकारकडून हा खर्च केला जाईल.
चुकीचे पाणी बिल माफ होईल : अनेकवेळा काही नागरिकांना चुकीचे पाणी बिल येते. हजारो रुपयांचे पाण्याचे बिल चुकीने पाठवले गेल्यास पाणी बिल माफ केलं जाईल.
२४ तास पाणीपुरवठा : आम आदमी पक्षाचं पुन्हा सरकार आल्यास २४ तास स्वच्छ पाणीपुरवठा केला जाईल.
यमुना नदी स्वच्छ : दिल्लीत पुन्हा आम आदमी पक्षाचं सरकार आल्यास यमुना नदी स्वच्छ करण्यासाठी निधी देऊन यमुना नदी स्वच्छ करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील.
दिल्लीतील रस्ते : दिल्लीत पुन्हा आम आदमी पक्षाचं सरकार आल्यास दिल्लीतील सर्व रस्ते युरोपसारखे बनवण्यासाठी पावलं उचलली जातील.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिष्यवृत्ती योजना : आम आदमी पक्षाचं सरकार आल्यास डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून दुसऱ्या देशातील विद्यापीठांमध्ये दलित मुलांच्या खर्चांची सर्व जबाबदारी दिल्ली सरकारची असेल.
विद्यार्थ्यांना मोफत बस : आम आदमी पक्षाचं सरकार आल्यास महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत बस सुविधा देण्यात येईल. तसेच दिल्ली मेट्रोमध्ये ५० टक्के सूट दिली जाईल.
पुजारी आणि ग्रंथींना १८ हजार : दिल्लीत पुन्हा आम आदमी पक्षाचं सरकार आल्यास पुजारी आणि ग्रंथींना प्रत्येकी १८ हजार रुपये दिले जातील.
मोफत वीज : दिल्लीत भाडे तत्वावर राहणाऱ्या नागरिकांनाही आता मोफत वीज आणि पाण्याची सुविधा दिली जाईल.
गटारांची स्वच्छता : दिल्लीतील गटारांची स्वच्छता राखण्यासाठी योग्य उपाययोजना करण्यात येतील. जिथे गटार बंद असेल तिथे ते १५ दिवसांत स्वच्छ केले जाईल आणि जुनी गटारे दीड वर्षात बदलण्यात येतील.
नवीन रेशनकार्ड : दिल्लीतील सर्व गरिब नागरिकांना नवीन रेशनकार्ड देण्यात येतील.
मुलीच्या लग्नासाठी १ लाख रुपये : दिल्लीतील ऑटो, टॅक्सी आणि ई-रिक्षा चालकांना त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी १ लाख रुपये दिले जातील.
१० लाख रुपयांचा जीवन विमा : ऑटो रिक्षा आणि ई-रिक्षा चालकांना १० लाख रुपयांचा जीवन विमा मिळेल. तसेच कुटुंबासाठी ५ लाख रुपयांचा आरोग्य विमा देण्यात येईल.
सुरक्षा रक्षक : सर्व आरडब्ल्यूएसाठी खासगी सुरक्षा रक्षक देण्याची हमी.


Belgaum Varta Belgaum Varta