नवी दिल्ली : जम्मू काश्मीरच्या पहलगामध्ये मंगळवारी मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे, या हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला, त्यानंतर आता मोदी सरकारने पाकिस्तानवर मोठी कारवाई केली आहे. सिंधु पाणी वाटपाच्या कराराला स्थगिती देण्यात आली आहे, तसेच अटारी बॉर्डर देखील बंद करण्यात आली आहे, सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर गुरुवारी सर्व पक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीमध्ये दहशतवादी हल्ल्यात आपला जीव गमावणाऱ्या नागरिकांना श्रद्धांजली देण्यात आली.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली, दोन तास चाललेल्या या बैठकीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या हल्ल्याबाबत माहिती दिली. सर्व पक्षीय नेत्यांकडून या दहशतवादी हल्ल्याचा निषेध कण्यात आला आहे. आम्ही सरकार सोबत आहोत, या प्रकरणात आम्ही सरकारच्या प्रत्येक कृतीचे समर्थ करू असे यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. तर सुरक्षा व्यवस्थेमध्ये नेमकी काय चूक झाली, यावर या बैठकीमध्ये चर्चा झाली, आम्ही सर्व विरोधी पक्ष सरकारसोबत ठामपणे उभे आहोत असे टीएमसीचे नेते सुदीप बंद्योपाध्याय यांनी म्हटले आहे.
दरम्यान या बैठकीमध्ये बोलताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी या हल्ल्यानंतर सरकारकडून आतापर्यंत काय कारवाई करण्यात आली याची माहिती दिली आहे. ही घटना खूप दुख:दायक आहे, या हल्ल्यामुळे देशात संतापाची लाट आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सरकारकडून अनेक महत्त्वाची पाउलं उचलली जात आहेत, असे रिजिजू यांनी म्हटले आहे.
या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती होती.
Belgaum Varta Belgaum Varta