
नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान गोंधळून गेला आहे. म्हणूनच तो सतत भारतात अयशस्वी हल्ले करण्याचा प्रयत्न करत आहे. 8 आणि 9 मे 2025 च्या मध्यरात्री जम्मू आणि काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर एका मोठ्या दहशतवादी गटाने घुसखोरीचा प्रयत्न केला. सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) दहशतवाद्यांचा हा प्रयत्न यशस्वीरित्या उधळून लावला आहे. या कारवाईदरम्यान भारतीय सैन्याने किमान सात दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. इतकंच नव्हे तर धंधार इथल्या पाकिस्तानी चौकीचंही भारतीय सैन्याने मोठे नुकसान केले आहे. याच पोस्टमधून घुसखोरीचे प्रयत्न केले जात होते.
“8 आणि 9 मे रोजी बीएसएफने जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर दहशवाद्यांच्या घुसखोरीचा एक मोठा प्रयत्न उधळून लावला आहे. किमान सात दहशतवाद्यांना सैन्याने ठार मारलंय आणि पाकिस्तान चौकी धंधारचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं”, अशी माहिती बीएसएफच्या सूत्रांनी दिली. त्यांनी चौकी उद्ध्वस्त केल्याची थर्मल इमेजर क्लिपसुद्धा शेअर केली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील अस्थिर परिस्थितीचा फायदा घेत या दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न सुरू आहे. परंतु त्यांच्या प्रयत्नांना हाणून पाडण्यासाठी भारतीय सैन्य अत्यंत सतर्क आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta