नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने बीसीसीआयने आयपीएल २०२५ स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. आता आयपीएल फक्त एका आठवड्यासाठी स्थगित केले असल्याची नवी माहिती समोर आली आहे.
एएनआयशी बोलताना बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले, ‘सध्याच्या परिस्थितीमुळे आयपीएल २०२५ एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आले आहे. चर्चा-सल्लामसलत केल्यानंतर स्पर्धेचे नवीन वेळापत्रक जाहीर केले जाईल. आम्हाला भारतीय सैन्याचा अभिमान आहे. बीसीसीआय देशातील सशस्त्र दलांच्या आणि सरकारच्या पाठीशी आहे.’
आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने सर्व प्रमुख स्टेकहोल्डर्सशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. बहुतेक फ्रँचायझींनी त्यांच्या खेळाडूंने व्यक्त केलेल्या भावना कौन्सिलकडे मांडल्या. त्यानंतर आयपीएल एका आठवड्यासाठी स्थगित करण्याचे ठरवण्यात आले आहे. या आठवड्यात आयपीएल संबंधित पुढील निर्णय घेतले जातील असे म्हटले जात आहे.