
उत्तरकाशी : उत्तराखंडमध्ये मागील दोन ते तीन दिवसांपासून अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. उत्तरकाशीमध्ये मध्यरात्री ढगफुटी झाल्याने मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत १७ कामगार बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत आहे. यमुनोत्री महामार्गावर पालीगाड ओजरी डाबरकोट दरम्यान ढगफुटी झाल्याने ही मोठी दुर्घटना घडली. या दुर्देवी घटनेची माहिती समजताच एसडीआरएफ, स्थानिक पोलीस आणि महसूल विभागाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या बचावकार्य वेगात सुरू आहे.
रिपोर्ट्सनुसार, ही घटना मध्यरात्री १ ते २ वाजण्याच्या दरम्यान घडली. उत्तरकाशीमध्ये मागील तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. शनिवारी रात्री उशीरा यमुनोत्री महामार्गावर पालीगाड ओजरी डाबरकोट दरम्यान ढगफुटी झाली. त्यानंतर एसडीआरएफ, पोलिस आणि महसूल विभागाचे पथक घटनास्थळी रवाना झाले. चौकशीदरम्यान, काही कामगार बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यांचा शोध घेतला जात आहे.
उत्तरकाशीमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे, त्यामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहे. बचावपथकाकडून मलब्याखाली अडकलेल्या मजुरांचा शोध घेतला जात आहे. स्थानिक प्रशासन, फायर ब्रिगेड आणि आरोग्य पथकही घटनास्थळी दाखल आहे.
Belgaum Varta Belgaum Varta