नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये हरवानमधील लिडवास परिसरात सोमवारी लष्कराने दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन महादेव राबवले. या शोधमोहिमेदरम्यान सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. तिन्ही मारले गेलेले दहशतवादी हे पहलगाम हल्ल्यातील संशयित असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भारतीय लष्कराच्या चिनार कोरच्या माहितीनुसार, लिडवास परिसरात गोळीबार सुरू झाला. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पोलीस, लष्कराचे जवान आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने मुलनारच्या जंगल परिसरात घेराव घातला तसेच शोधमोहीम हाती घेतली. सुरक्षा दलाचे जवान निश्चित झालेल्या ठिकाणी पोहोचल्यानंतर तेथे दडून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला सुरक्षा दलाच्या जवानांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. जवान आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली. चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले. शोधमोहीम अद्याप सुरू आहे, अशीही माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
ऑपरेशन महादेव सुरूच
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हरवानच्या मुलनार परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी शोधमोहीम सुरू केली. या दरम्यान, काही अंतरावरून गोळीबाराचा आवाज आला. त्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी प्रत्युत्तर दिले.
Belgaum Varta Belgaum Varta