लखनौ : उत्तर प्रदेशातील गोंडा येथे रविवारी (3 ऑगस्ट 2025) एक भीषण रस्ता अपघात झाला. इटियाथोक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेलवा बहुता मजरा रेहरा येथे बोलेरो गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी कालव्यात कोसळली. या अपघातात गाडीतील 11 भाविकांचा मृत्यू झाला, ज्यामध्ये 9 जण एकाच कुटुंबातील असल्याचे सांगितले जात आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.
मोतीगंजमधील भाविकांचा अपघात
मोतीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सीहागांव येथील एक भाविकांचा गट बोलेरो गाडीतून खरगूपूर येथील प्रसिद्ध पृथ्वीनाथ मंदिरात जलाभिषेकासाठी जात होता. याचवेळी अचानक बोलेरो सरयू कालव्यात कोसळली. या अपघातामध्ये 11 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.
बोलेरोत 15 जण होते
प्रत्यक्षदर्शींनुसार, बोलेरो गाडीत एकूण 15 प्रवासी होते, ज्यामध्ये महिला आणि मुलांचाही समावेश होता. गाडी बेलवा बहुता मजरा रेहरा येथे पोहोचली तेव्हा चालकाने अचानक गाडीवरील नियंत्रण गमावले आणि गाडी थेट सरयू कालव्यात कोसळली. रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी तातडीने आरडाओरड करत स्थानिक ग्रामस्थांना आणि पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच इटियाथोक पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले.
मृतांमध्ये पुरुष, महिला आणि मुले
मृतांमध्ये पुरुष, महिला आणि मुलांचा समावेश आहे. उरलेल्या चार जणांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मृतांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. स्थानिक प्रशासनाने तातडीने मदत आणि बचावकार्य सुरू केले असून पीडित कुटुंबांना सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta