
उत्तरकाशी : उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी येथे मंगळवारी दुपारी मोठी दुर्घटना घडली. येथे भारतीय लष्कराच्या तळापासून साधारण 4 किमी दूर असणाऱ्या धराली गावात ढगफुटी झाली आहे. या ढगफुटीमुळे धराली गावात मोठा विध्वंस झाला आहे. घडफुटी झाल्यानंतर त्या भागात मोठा पूर आला असून तब्बल 4 लोकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत 50 पेक्षा जास्त लोक गायब झाले आहेत. दुर्घटनेची माहिती होताच या भागात युद्धपातळीवर बचावकार्य चालू आहे.
या ढगफुटीमुळे पवित्र गंगोत्री धामचा रस्तादेखील वाहून गेला आहे. अचानक आलेल्या ढगफुटीमुळे चिखल आणि पाण्याचा फार मोठा पूर आला आहे. या पुरात धराली परिसर जलमग्न झाला आहे. ही दुर्घटना घडताच आपत्कालीन मदत पाठवण्यात आली असून तिथे युद्धपातळीवर बचावकार्य केले जात आहे.
उत्तरकाशीचे जिल्हाधिकारी प्रशांत आर्य यांनी या घटनेची सविस्तर माहिती दिली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत पाच लोकांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. या दुर्घटनेत आणखी किती लोकांचा मृत्यू झाला तसेच वित्तहानी किती झाली? हे आगामी काळात समजेल, असे प्रशांत आर्य यांनी सांगितले.

Belgaum Varta Belgaum Varta